देवळाली प्रवरात गटार योजनेच्या निविदेवरून आरोप-प्रत्यारोप विरोधी नगरसेवकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन; कामांस स्थगितीची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहर भूमिगत गटार टप्पा क्रमांक 1 च्या कामांची निविदा दमडी शिल्लक नसताना घाईगर्दीत काढून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान करत ठेकेदाराच्या घशात घातल्याचा आरोप देवळाली प्रवरा पालिकेचे नगरसेवक शैलेंद्र कदम व नगरसेविका सुनीता थोरात यांसह विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.

देवळाली प्रवरा शहराला महत्त्वाकांक्षी ठरणारी योजना महाविकास आघाडी सरकारने विरोधी भाजप सत्तेत असताना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विभागाने मंजूर केली. या योजनेच्या कोणत्याही अटीशर्तीचे पालन न करता तसेच विरोधी नगरसेवकांचे आक्षेप विचारात न घेता सुमारे दीड कोटी जादा रकमेची ही निविदा मंजूर करण्यात आली. या घाईगडबडीने ही योजना पूर्ण न होता निव्वळ ठेकेदाराच्या घशात निधी घातल्याचा संशय निर्माण झाला आहे. नगरपरिषदेत नगरसेवकांचे शेवटचे काही दिवस उरले असताना बेकायदेशीर कामाचा तडाखा लावला आहे. या कामास तातडीने स्थगिती देऊन काम थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याच्या प्रती नगरविकास राज्यमंत्री व सचिवांना देण्यात आल्या आहेत.

याबाबत नगराध्यक्ष सत्यजीत कदम म्हणाले, भूमिगत गटारी योजनेचा निधी मंजूर झाला. नंतर दरवाढ झाल्याने ही निविदा साडेतीन टक्के वाढवून देण्यात आली. हा विषय नगरषरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. त्या सभेस विरोधी नगरसेवक उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विरोध का केला नाही? फक्त निवडणुका जवळ आल्या म्हणून बदनामी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही नगरपरिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात असती तर यापेक्षा जादा दराने निविदा दिली असती. इतर नगरपरिषदेचे दर विरोधकांनी तपासून पाहावेत, मगच आरोप करावेत. यापूर्वी पाणी पुरवठा योजना साडेनऊ टक्के जादा दराने द्यावी लागली, तेव्हा कोणी विरोध केला नाही. मग आताच का पोटात दुखू लागले? हा फक्त निवडणूक स्टंट असल्याचे न समजण्याइतकी जनता नक्कीच दूधखुळी नाही, असे ते म्हणाले.
