निसर्गाच्या लहरीपणाने चार एकर कांदा सडला! एकामागून एक येणार्‍या संकटांनी शेतकरी वैतागले..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील विनीत सुभाष करंजेकर या शेतकर्‍याला निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसला आहे. तब्बल चार एकर शेतातील लाल कांदा सडून गेला असून अवघा साठ गोणी कांदा निघाला आहे. त्यामुळे इतर सर्व कांदा शेतकर्‍याने शेतातच टाकून दिला असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. यातून साधा खर्चही वसूल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खंदरमाळ येथील कांदा उत्पादक विनीत करंजेकर या तरुण शेतकर्‍याने चार एकर शेतात तीन-चार महिन्यांपूर्वी लाल कांद्याची लागवड केली होती. गेल्या दोन वर्षांपासून शेतीत नुकसानच होत आहे. किमान यातून तरी चांगले पैसे होतील अशी अपेक्षा करंजेकर यांना होती. मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस, सततचे धुके अशा वातावरणाच्य लहरीपणामुळे कांद्यावर प्रतिकूल परिणाम झाला. सध्या कांदा काढणी सुरू आहे. मात्र, सर्रासपणे सडका निघत आहे. त्यामुळे वैतागून करंजकर यांनी तब्बल चार एकर शेतातच टाकून दिला आहे. अवघा ऐंशी गोणी चांगला कांदा चांगला निघाला त्यातून उत्पादन खर्चही सुटणार नसल्याचे करंजेकर यांनी सांगितले.

चार एकर शेतातून चारशे गोणी कांदा निघेल अशी अपेक्षा करंजेकर यांना होती. परंतु, अवघा ऐंशी गोण्या चांगला कांदा निघून, सुमारे 340 गोण्या कांदा सडून गेला आहे. वैतागून हा कांदा शेतातच टाकून दिल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान कोरोना, अवकाळी, लहरी हवामान अशा एकामागून एक संकटांनी आधीच शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यात बाजारभाव देखील नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः वैतागले असून, काही शेतकर्‍यांनी कांद्याची रोपे विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

लाल कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे चार एकरवर लागवड केली. यासाठी रोपे, लागवड, खत-औषधे, मजुरी असा सुमारे 1 लाख रुपये खर्च आला. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने यावर पाणी फिरल्याने कांदा सडून गेला आहे. त्यामुळे वैतागून जागेवरच सोडून दिला आहे.
– विनीत करंजेकर (कांदा उत्पादक-खंदरमाळ)

Visits: 288 Today: 2 Total: 1422244

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *