आदिवासी समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा राजूर प्रकल्प अधिकार्यांना दिले मागण्यांचे निवेदन

नायक वृत्तसेवा, राजूर
विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषदेच्यावतीने राजूर (ता.अकोले) येथील प्रकल्प कार्यालयावर गुरुवारी (ता.२१) मोर्चा काढून प्रकल्प अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले की, भिल्ल विकास आराखडा मंजूर करा, अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासींना दुधाळ जनावरे द्या, आदिवासी समाजाचा आर्थिक निधी इतरत्र वळवू नका, कसेल त्याची जमीन, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा, घरगुती वीज देऊन वीजबिल शासनाने भरावे, न्यूक्लियस बजेटमध्ये भरीव तरतूद करावी, शबरी मंडळाचे कर्ज माफ करावे अशा मागण्या आदिवासी एकता परिषदेच्यावतीने वाहरू सोनवणे, कैलास माळी, देवीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

दरम्यान, राजूर शहरातून निघालेला मोर्चा आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाहेर अडविण्यात आला. नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातून भिल्ल समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मधुकर तळपाडे म्हणाले, आदिवासी भागात पाणी, वीज आदिवासी समाजाच्या जमिनीवर असून सरकारने त्यांना रॉयल्टी द्यावी, जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, घुसखोरी थांबवावी, वसतिगृहात सर्व मुलांना प्रवेश द्यावा, ९ टक्के निधी इतरत्र वळविला जातो तो थांबवावा अशा मागण्या केल्या.

जया सोनवणे यांनी आदिवासी महिलांवर होणारा अन्याय, आरोग्य, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यावर प्रशासनाकडून होणारे अत्याचार यावर सरकारने गांभीर्याने पाहायला पाहिजे असे आवाहन केले. जल, जंगल, जमीन आदिवासींचे असून त्यांच्या हक्कापासून कुणी बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिला. प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
