आकाशपाताळ एक करू पण ओबीसी समाजाला आरक्षण देऊ ः मुश्रीफ अकोले नगरपंचायत निवडणूक; प्रचारसभेत विरोधकांवर हल्लाबोल

नायक वृत्तसेवा, अकोले
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यातील तत्कालीन नेत्यांना सर्वकाही देत प्रचंड प्रेम केले. परंतु त्यांनी मात्र विश्वासघात करून पवार साहेबांना उतारवयात मनःस्ताप दिला. त्यामुळे जनतेने डॉक्टर किरण लहामटे यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देत धडा शिकविला. आता नगरपंचायत निवडणुकीतही मतदार नक्कीच परत एकदा धडा शिकवतील. तसेच ओबीसीचे आरक्षण भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुणावनीतून गेले. मात्र, आकाशपाताळ एक करू पण ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देऊ असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

अकोले नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेना विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मुश्रीफ यांची सभा शनिवारी (ता.18) अकोले बसस्थानक परिसरात झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. किरण लहामटे होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर, यमाजी लहामटे, विठ्ठल चासकर, संपत नाईकवाडी, सुरेश गडाख, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, भाऊपाटील नवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले व प्रदीप हासे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सीताराम गायकर म्हणाले, वास्तविक भाजपला मते मागण्याचा अधिकार नाही. शेतकर्‍यांच्या मुलांनी भाजपला मतदान करण्याआधी केंद्रातील तीन काळे कृषी कायदे बघावेत. ज्याने शेकडो बळी घेतले त्या शहीद शेतकर्‍यांच्या स्मृती आठवाव्यात. अल्पसंख्यक समाजाने सीसीए, एनआरआरसी आठवावेत. अकोले नगरपंचायत स्थापनेनंतर राष्ट्रवादीकडून निवडून आलेले नगरसेवक नंतर पिचड पितापुत्रासह भाजपात गेले. आता पुन्हा भाजपकडून तेच लोक उभे आहेत. मतदारांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही.

संपत नाईकवाडी म्हणाले, जिल्हा नियोजन समिती व अल्पसंख्याक समाजासाठी विकास निधी नगरपंचायतला अद्यापपर्यंत मिळाला नाही. तो देण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष घालावे. अकोल्यातील अधिकारी नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहेत. ठराविक भाजप नेत्यांवर कृपादृष्टी ठेवतात. महाविकासआघाडी पदाधिकार्‍यांचे अजिबात ऐकून घेत नाहीत, असा हल्लाबोल केला. यावेळी अनेकांची भाषणे झाली. नगरपंचायत एलईडी खरेदी भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवून चौकशीची मागणी केलेले कार्यकर्ते निखील जगताप यांनी राष्ट्रवादी शिवसेना विकास आघाडीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी अध्यक्षीय सूचना केली. त्यास शेतकरी सेनेचे प्रदीप हासे यांनी अनुमोदन दिले. प्रास्ताविक अरुण रूपवते व सूत्रसंचालन तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर यांनी केले. याप्रसंगी अगस्तिचे संचालक गुलाब शेवाळे, बाळासाहेब ताजणे, अमित नायकवाडी, भागवत शेटे, विकास बंगाळ, ईश्वर वाकचौरे, शरद चौधरी, आनंद वाकचौरे, संजय वाकचौरे, विजय देशमुख, अक्षय आभाळे, नितीन नाईकवाडी व राष्ट्रवादी शिवसेना विकास आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

Visits: 13 Today: 1 Total: 114986

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *