शिर्डीतील ऑक्सिजन प्लान्ट मंगळवारपासून होणार सुरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार शुभारंभ
नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत रिलायन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी 1200 एल. पी. एम. क्षमता असलेली प्रणाली (पीएसए) बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. मंगळवारी (ता.18) दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात येणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.
साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालय शेजारच्या हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा हा प्लान्ट कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी जीवदान ठरणार असून या ऑक्सिजन प्लान्टचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील खासदार तसेच सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांना समस्यांचा सामना सहन करावा लागला. देश-विदेशात नावलौकिक मिळवलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा आणि साईनाथ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी रिलायन्स समूहाशी संपर्क साधून हवेतून ऑक्सिजन निर्माण होणार्या प्लान्टबाबत चर्चा केली आणि त्यांनी तातडीने होकार दर्शवित सुमारे दोन कोटी रुपये खर्च असलेल्या 1200 एल. पी. एम. क्षमतेच्या पी. एस. ए. प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला.
साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या साईनाथ रुग्णालयाशेजारच्या जागेवर महिनाभरात कामकाज सुरू करून अखेरीस पूर्ण झाले. साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटलच्या सुमारे अडीचशे खाटांना चोवीस तास पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. हवेने इन्स्टॉलेशन होणार्या या प्लान्टची पाहणी व वारंवार आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी घेऊन हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.
हवेने ऑक्सिजन तयार करणारा हा प्लान्ट कोविड रुग्णांसाठी वरदान ठरेल. या प्रकल्पामुळे ऑक्सिजनसाठी आता साईबाबा संस्थानचे वर्षाकाठी कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. या प्लान्टसाठी मात्र अनुभवी टेक्निकल असिस्टंटची गरज भासणार असून संस्थानकडे याकामी अनुभवी कामगार वर्ग आहे की नाही याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.