वन विभागाच्या अन्यायाविरोधात किसान सभा उतरली मैदानात रानटी झाडे उपटून आदिवासी शेतकर्‍यांची गावागावांतून मोर्चाला सुरूवात

नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हरिश्चंद्र-अभयारण्य परिसरात वन विभागाने आदिवासी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. अभयारण्य परिसरात लव्हाळी ओतूर येथे वन विभागाने आदिवासी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावली. आदिवासींची उभी पिके उध्वस्त करण्याचे प्रयत्न केलेे. वन विभागाच्या या अन्यायाविरोधात किसान सभा मैदानात उतरली असून वन विभागाने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांमध्ये लावलेली ही रानटी झाडे उपटून काढण्यासाठी गावोगाव मोर्चे काढण्याची सुरूवात किसान सभेने केली आहे. अभयारण्य परिसरातील लव्हाळी ओतूर येथील मारुती मंदिरात सभा घेऊन व वाजत गाजत मोर्चा काढत शेतातील वन विभागाची रानटी झाडे उपटून फेकत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

आदिवासी शेतकरी कसत असलेली जमीन कसणारांच्या नावे करण्यासाठीची प्रक्रिया देशभर सुरू आहे. अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनी यासाठी विहित प्रक्रियेंतर्गत वनाधिकार ग्राम समित्यांकडे यासाठी अर्ज केले आहेत. किसान सभेच्या पुढाकाराने परिसरातील हजारो गरीब शेतकर्‍यांची वन प्रकरणे पात्र करण्यासाठी अपिले दाखल करण्यात आली आहेत. असे असताना कोणत्याही आदेशाची किंवा अंतिम निकालाची वाट न पाहता वन विभाग आदिवासींच्या शेतात अशाप्रकारे घुसणार असेल तर आदिवासींना किसान सभेच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात घुसावे लागेल असा इशारा यावेळी किसान सभेचे नामदेव भांगरे यांनी दिला आहे. भर पावसात वाजत-गाजत काढण्यात आलेल्या या मोर्चात अभयारण्य परिसरातील 23 गावचे शेतकरी सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्य व क्रांतिकारक घोषणा देत मारुती मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. गावाच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा अभयारण्यात नेण्यात आला. हरिश्चंद्रगड निम्मा चढत मोर्चा अभयारण्यातील शेतात नेण्यात आला. शेकडो शेतकरी मोर्चाने डोंगर चढत शेतात पोहोचले. शेतकर्‍यांच्या शेतात लावलेली झाडे उपटत यावेळी वन विभागाच्या अन्यायाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या. उपटलेली झाडे वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जंगलामध्ये नेऊन लावली गेली.

वन विभागाने नुकतेच महसूल विभागाच्या मदतीने तालुक्यातील अभयारण्य परिसरातील 32 गावातील मालकी जमिनीवर वन विभागाचे नाव लावणार असल्याचे अत्यंत संतापजनक आदेश काढले होते. आमदार डॉ. किरण लहामटे व किसान सभेने याबाबत आदिवासी शेतकर्‍यांची बाजू घेत या आदेशाची अंमलबजावणी थांबवली होती. आता त्यानंतर वन विभागाने शेतात झाडे लावण्याची आगळीक करून पुन्हा अभयारण्य परिसरातील वातावरण कलूषित करण्याचे प्रयत्न केले आहेत. किसान सभा वन विभागाचे असे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. लव्हाळी ओतूर येथून या विरोधात सुरू झालेले अभियान संपूर्ण तालुकाभर राबविण्यात येणार असून वन विभागाने शेतात लावलेली रानटी झाडे परिसरातील शेतकरी सामुहिकपणे उपटून काढणार आहेत. वन विभागाच्या अन्यायाविरोधात केलेल्या या आंदोलनाचे परिसरात स्वागत होत आहे. किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य नामदेव भांगरे, सदाशिव साबळे, जिल्हा कौन्सिल सदस्य राजू गंभीरे, एकनाथ मेंगाळ, भीमा मुठे, लक्ष्मण घोडे, भाऊसाहेब साबळे, शिवराम लहामटे, मधुकर नाडेकर, भास्कर बांडे, किसन बांडे आदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

Visits: 16 Today: 1 Total: 116251

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *