‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी आहोत!’

‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी आहोत!’
घरवापसीवर माजी आमदार वैभव पिचड यांची सावध प्रतिक्रिया
नायक वृत्तसेवा, अकोले
राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे अशा संभाव्य नावांवर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव या यादीत घेतले जात होते. मात्र, त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी आहोत’ अशी सावध प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे.


ज्येष्ठ नेते पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू मानले जात होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी पुत्र वैभव यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. मधल्या काळात पिचडांनी पवारांवर टीकाही केली होती. मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केल्यावर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची बाजू घेतली होती. ‘शरद पवारांचं नेतृत्व मोठं आहे. ते कुणीही अमान्य करू शकत नाही,’ असं म्हणत पिचड यांनी भाजपच्या पडळकर यांनाच चुकीचे ठरविले होते. या पार्श्वभूमीवर जेव्हा घर वापसीची चर्चा झाली, तेव्हा सहाजिकच पिचड यांचे नावही चर्चेत आले.


भंडारदरा धरण भरल्याने त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी वैभव पिचड यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंबंधी विचारणा केली. त्यावर पिचड म्हणाले, ‘काही वृत्तवाहिन्यांनी घरवापसी संबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या. त्यांच्या यादीत ते माझेही नाव घेत होते. मात्र असे काहीही नाही. माझा अद्याप कोणाशीही संपर्क झालेला नाही. सध्या तरी मी दिल्या घरी सुखी आहे, आम्ही राष्ट्रवादीत परत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ.किरण लहामटे विजयी झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि त्यानंतरच्या काही काळात पिचडांनी पवारांवर टीका केली होती. तर प्रचाराच्यावेळी स्वत: पवार आणि अजित पवार यांनीही पिचडांवर टीका केली होती. हळूहळू वातावरण बदल गेले. पिचडांनी पवारांवरील टीका तर थांबविलीच उलट पडळकर प्रकरणाच्यावेळी स्वपक्षाची म्हणजे भाजपची नाराजी पत्कारून पवारांची बाजू जाहीरपणे लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्या घरपावसीची चर्चा असली तरी पिचडांना त्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे.

Visits: 278 Today: 2 Total: 1591542

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *