नियम मोडणार्या गणेश मंडळांची पोलिसांकडून गय केली जाणार नाही ः वाघचौरे
नियम मोडणार्या गणेश मंडळांची पोलिसांकडून गय केली जाणार नाही ः वाघचौरे
राहाता येथे पदाधिकार्यांसह अधिकार्यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक
नायक वृत्तसेवा, राहाता
विना परवानगी श्रीगणेश मूर्ती प्रतिष्ठापना करणार्या व गणेशोत्सव संदर्भातील मार्गदर्शक सूचना, शासन नियम मोडणार्या गणेश मंडळाची पोलिसांकडून गय केली जाणार नाही. अशा मंडळांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देत सार्वजनिक ठिकाणांऐवजी आपापल्या घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहाता पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच यांची संयुक्त बैठक राहाता तालुका पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पोलीस उपाधीक्षक वाघचौरे बोलत होते. यावेळी तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
![]()
पुढे बोलताना वाघचौरे म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याकरिता शासन नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागेल. शासनाने त्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व निर्देशांचे व नियमांचे पालन करूनच मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणे गरजेचे आहे. प्रतिष्ठापना करताना ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे श्रीगणेश मूर्तीची उंची असावी प्रतिष्ठापना अथवा विसर्जन प्रसंगी मिरवणुकीवर बंदी घातलेली आहे. स्थानिक प्राधिकरण व पोलीस प्रशासन यांची परवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक मंडळाला गणेश मूर्ती बसवता येणार नाही. परवानगीनंतर वीज मीटर घेणे अथवा ज्याच्याकडून विद्युत पुरवठा घेणार आहे त्या संबंधित व्यक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ध्वनि प्रदूषण होऊ नये म्हणून वाद्य वाजिवण्यास बंदी आहे, चार पेक्षा जास्त लोक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी दिसल्यास जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल होऊ शकतील. या सर्व बाबींची दखल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. विना परवानगी, बेकायदा व नियम मोडून प्रतिष्ठापना करणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे समाजाला व नागरिकांना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांची पोलिसांकडून गय केली जाणार नाही असा इशाराही पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांनी दिला. तसेच एक गाव एक सार्वजनिक गणपती ऐवजी एक गाव शून्य सार्वजनिक गणपती अशी संकल्पना राबवून प्रशासनाला सहकार्य करावे व राज्यात नवा संदेश द्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
![]()
तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीमुळे बकरी ईद, रमजान, आषाढी एकादशी त्याचप्रमाणे साईबाबांच्या शिर्डीतील गुरुपौर्णिमा, रामनवमी यांसारखे मोठे उत्सव आपण सर्वांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. त्याच धर्तीवर आता गणेशोत्सव आपण साध्या पद्धतीने यावर्षी साजरा करा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी केले. यावेळी गणेश सोमवंशी, पोलीस पाटील भगवान डांगे, खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे, पोलीस पाटील रावसाहेब लावले, पिंपळाचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गुगळे, पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते गणेश निकाळे, प्रदीप बनसोडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
