संगमनेरच्या नोकरी महोत्सवातून राजकीय तिरंदाजी! मतदारसंघाच्या राजकारणात नवा ‘ट्विस्ट’; फलकांवरील ‘रंगसंगती’ही चर्चेत..


श्याम तिवारी, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून संपूर्ण राज्यात राजकीय संभ्रम निर्माण करणार्‍या आमदार सत्यजित तांबे यांनी रविवारी संगमनेरात ‘युथोत्सव’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून मतदारसंघातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासह उद्योग आणि कौशल्य या विषयावर मार्गदर्शनही होणार आहे. विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यापासून आमदार तांबे अधिक सक्रिय झाले असून त्यातूनच या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. मात्र या महोत्सवाच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या फलकांसह संपूर्ण जाहिरात प्रक्रियेत वापरण्यात आलेली ‘रंगसंगती’ आणि कार्यक्रमाला भाजपच्या राज्यमंत्र्यांची उपस्थिती स्थानिक राजकारणात ‘ट्विस्ट’ निर्माण करणारी ठरत असून आमदार तांबे ‘नोकरी महोत्सवातून’ राजकीय ‘तिरंदाजी’ करीत असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.


लागोपाठ तीनवेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या डॉ.सुधीर तांबे यांनी 2023 मध्ये आपल्याऐवजी पक्षाने सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. या दरम्यान भाजपनेही उमेदवार देण्याचे टाळून सत्यजित तांबे यांच्या पंखात बळ भरण्याचे काम केले. या दोन्ही घडामोडीतून पाच जिल्हे आणि 56 तालुक्यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासह संपूर्ण राज्यात राजकीय संभ्रम निर्माण झाला. याच काळात तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय जवळीक वाढत असल्याचेही दिसून आले. त्यावेळच्या निवडणूकीत काँग्रेसने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या काहीतास अगोदर सुपूत्राच्या उमेदवारीची मागणी फेटाळून डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे डॉ.तांबेच नाशिकमधील काँग्रेसचे उमेदवार असतील असे वाटत असताना अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी आपली अधिकृत उमेदवारी टाळून आपले सुपूत्र सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या काँग्रेसने दोघाही पिता-पूत्रांना पक्षातून निलंबित करीत शुभांगी पाटील यांच्या पर्यायी उमेदवारीला मान्यता दिली. अर्थात त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र आपण त्यांच्यावरच निर्णय सोडून त्यांना दोन एबी फॉर्म पाठवल्याचा दावा केल्याने सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी ‘गुढ’ बनली, जी आजही कायम आहे.


डॉ.सुधीर तांबे यांनी आपल्या एका तपाच्या कारकीर्दीत नाशिक मतदारसंघात केलेली कामं, वाढवलेला मोठा जनसंपर्क, निवडणुकांचा दांडगा अनुभव असलेली समर्पित यंत्रणा आणि त्यात भाजपचे उघड समर्थन या गोष्टींमुळे सत्यजित तांबे यांचा सहज विजय होवून ते आमदार झाले. खरेतर 2001 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षापासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत संघटनात्मक काम करणार्‍या सत्यजित तांबे यांना पक्षाकडून सन्मानजनक पदावर पाठवलं जाणं आवश्यक होतं. मात्र पक्षाने तब्बल अडीच दशके त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नेमकी हिच गोष्ट ओळखून वेळोवेळी त्याला हवा देण्याचा प्रयत्न केला. ‘सिटीझन विल’ या अनुवादीत पुस्तकाच्या प्रकाशनावेळी खुद्द तांबेंचे मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच फडणवीसांनी ‘सत्यजितसारख्या तरुणांवर आमचीही नजर असते..’ असे सूचक वक्तव्य केले होते. या दरम्यानच्या काळात काँग्रेसकडून डॉ.सुधीर तांबे यांचे निलंबन मागे घेतले गेले, मात्र सत्यजित तांबे आजही ‘अपक्ष’ आमदार आहेत.


गेल्या दीड-दोन वर्षातील त्यांच्या कारकीर्दीकडे पाहता त्यांनी राज्य सरकारवर टीका केल्याचे आढळून येत नाही. विधानसभा निवडणुकीतही त्यांची भूमिका ‘गुढ’च होती. आघाडीकडून महायुतीवर घणाघात होत असतानाही त्यांच्याकडून मात्र राज्य सरकार विरोधात एकही शब्द उच्चारला गेला नाही. छोट्याशा कारकीर्दीत मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला, त्यातून त्यांना कामेही करता आली, येत आहेत. यासर्व गोष्टी पदवीधरला निर्माण झालेल्या संभ्रमात भर घालत असतानाच आता त्यांनी उद्या रविवारी (ता.16) संगमनेरात ‘युथोत्सव’ आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून तालुक्यातील बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध कंपन्यांचे अधिकारी हजर असणार आहेत. ज्यांच्या निवडी होतील त्यांना लगेच नियुक्तिचे पत्र दिले जाणार आहे.


यासोबतच केंद्र सरकारच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पुढे नेताना त्याविषयीच्या मार्गदर्शन सत्रांसह उद्योजकता वाढवण्यासाठी विशेष चर्चासत्रही होणार आहेत. हा कार्यक्रम जाहिरातीप्रमाणे यशस्वी झाला तर नक्कीच तालुक्यातील अनेक तरुणांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी या जाहिरातींनी ‘सत्यजित तांबे’ यांची ‘गुढ’ प्रतिमाही पुन्हा एकदा ठळक केली आहे. त्यांनी शहराच्या प्रमुख ठिकाणी लावलेल्या फलकांवर आणि स्वागत कमानींवर वापरलेली ‘रंगसंगती’ भाजपच्या रंगसंगतीशी जुळणारी असल्याचा सूर उठत असतानाच आता या ‘युथोत्सवात’ भाजपचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म मंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थिती लाभणार असल्याचा अधिकृत शासकीय दौराही समोर आला आहे. त्यानुसार मंत्री महोदय रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत असतील.


डॉ.भोयर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकवर्तीय वर्तुळातील आहेत. त्यामुळे त्यांची या कार्यक्रमातील तब्बल अडीच तासांची उपस्थिती भुंवया उंचावणारी ठरली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच जनसेवा मंडळाच्यावतीने जाणताराजा मैदानावर पैठणी महोत्सव साजरा झाला. त्या कार्यक्रमातून डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय मशागत केली. त्यानंतर अवघ्या पंधरवड्यातच ‘अपक्ष’ आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून ‘युथोत्सव’ आयोजित होवून त्याच्या उद्घाटनासाठी भाजपच्या कोट्यातील आणि फडणवीसांच्या वलयातील राज्यमंत्र्यांची उपस्थिती आणि त्यानंतर राज्यमंत्र्यांचे लोणीकडे प्रस्थान होवून माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याशी गुप्तगू राजकीय तिरंदाजीची अनुभूती देणारी ठरणार आहे. एकंदरीत गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणाला संभ्रमात टाकणार्‍या आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरच्या राजकारणात नवा ‘ट्विस्ट’ निर्माण केला आहे.


पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून काँग्रेसकडून दूर असलेल्या सत्यजित तांबे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेहाचे संबंध असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आमदार तांबे यांनीही गेल्या दीड-दोन वर्षाच्या कालावधीत राज्य अथवा केंद्र सरकारवर प्रखर टीका केल्याचे ऐकिवात नाही. त्यातच आता ‘पैठणी महोत्सवा’नंतर लागलीच ‘युथोत्सव’ आयोजित झाल्याने आणि त्यासाठी केलेल्या जाहिरातबाजीसाठी वापरलेली रंगसंगती, मामासह आपल्या माता-पित्यांनाही फलकांवरुन ‘गायब’ करण्याचा प्रकार आणि कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येणार्‍या राज्यमंत्र्यांची पार्श्‍वभूमी पाहता आगामी काळात संगमनेरच्या राजकारणात नवा ‘ट्विस्ट’ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Visits: 60 Today: 1 Total: 308745

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *