स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण… कांदडवाडीतील बायाबापडे दोन किलोमीटरची पायपीट करुन आणताहेत पाणी..

संजय महानोर, भंडारदरा
अकोले तालुक्यातील उडदावणे गावच्या कांदडवाडीतील अनुसूचित जाती वस्तीतील बायाबापडे पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातून वाट काढत तब्बल दोन किलोमीटरची दररोज पायपीट करतात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न कायमस्वरुपी मिटवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

उडदावणे हे गाव भंडारदरा धरणाच्या पाणलोटात येत असून उडदावण्यातील कांदडवाडी ही 15 ते 18 घरांची असलेली छोटीसी वाडी आहे. एका डोंगराच्या टेकडीवर ती वसलेली असून, याच कांदडवाडीमध्ये अनुसूचित जाती वस्तीचाही समावेश आहे. या वस्तीसह कांदडवाडीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातून वाट काढत दोन किलोमीटरची दररोज पायपीट करावी लागते. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात हे गाव असूनही थेट धरणाच्या काठावरुनच महिलांना हंडे भरावे लागतात. परंतु, पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता अतिशय अवघड आहे. भरलेला हंडा डोक्यावर घेऊन चालणे म्हणजे महिलासांठी मोठी कसरतच आहे. त्यात वाट जंगलातील असल्याने वन्यप्राणी आणि सरपटणार्‍या प्राण्यांचाही धोका असतो.

आजपर्यंत आमच्या दारात कधी नळच आला नसल्याचे येथील महिला सांगतात. काही वर्षापूर्वी या वाडीवर एक विहीर श्रमदानातून खोदली गेली. पंरतु ती देखील भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये असल्याने या विहिराचाही काहीच फायदा होत नसल्याचे येथील महिला सांगतात. येथील वसंत सोनवणे यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी माध्यमांपुढे टाहो फोडला आहे. ते म्हणतात, आम्ही या वरखडलेल्या डोंगराच्या पोटाला वानरा माकडासारखे राहतो. आमचे वाडवडील ‘पाणी पाणी म्हणता देवाच्या घरी गेले’ पण आमच्या दारात कधी नळ आलाच नाही. समोर जे भंडारदरा धरण दिसतयं तिथवर आमच्या बायाबापडे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पाण्यासाठी पळतात. जसंजसं धरणाचं पाणी खोलवर जाईल तसतसं पाण्यासाठी डवरं (झिरे) उकरावी लागतात. पाण्याचा ठाव लागवा तर नशीब समजायचं, नायतर म्होरला ढवरा परत उकरायचा, हेच आमच्या नशिबी आलं आहे. सरकारी अधिकारी आमच्या दारात बापजाद्यांच्या कालावधीत पण आला नाय आनं मला पण आलेला आठवत नाही. तवा मी या मीडियावाल्यांना विनंती करतो की तुम्ही तरी आमच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा आवाज उठवा. एखाद्या सरकारी योजनेतून आम्हाला पाणी द्या. यावेळी लक्ष्मण सोनवणे, प्रकाश तिखांडके, सोमा गिर्‍हे, दशरथ सोनवणे व काही महिला उपस्थित होत्या.


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानंतरही आदिवासी भागातील मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, निवारा या समस्या जैसे थेच असल्याने सरकारचा त्यांना कोणताही फायदा मिळत नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे सरकारने अशा दुर्लक्षित भागाकडे विशेषत्वाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Visits: 124 Today: 1 Total: 1419365

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *