राहुरी कारावासातील पाच कैदी गज कापून फरार! पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर; दोघांना पकडले, तिघांचा शोध सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी
अहमदनगर जिल्ह्यात दरोडे, जबरी चोर्या, लुटमार, घातक शस्त्राने हिंसाचार अशा विविध गुन्ह्यांतील धुमाकूळ घालणार्या नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केलेल्या राहुरीच्या कारागृहातील पोलीस पुत्र कुख्यात सागर भांड टोळीने शनिवारी (ता.18) पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी खिडकीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले. पळालेल्या पाच कैद्यांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीन कैदी पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सागर अण्णासाहेब भांड (वय 25, रा. ढवण वस्ती, नगर, हल्ली रा. संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे), किरण अर्जुन आजबे (वय 26, रा. भिंगार), नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय 22, रा. मोरे चिंचोली, ता. नेवासा), रवी पोपट लोंढे (वय 22, रा. घोडेगांव, ता. नेवासा), जालिंदर मच्छिंद्र सगळगिळे (वय 25, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) अशी कारागृहातून पळालेल्या कैद्यांची नावे आहेत. पैकी भांड व आजबे यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. राहुरी कारागृहात बरॅक नंबर चार मध्ये एकूण सतरा कैदी ठेवले आहेत. त्यात, टोळीप्रमुख कुख्यात सागर भांडसह पाचजण न्यायालयीन कोठडीत होते. कारागृहाच्या मागील भिंतीच्या छता जवळील खिडकीचे नऊपैकी तीन गज कापण्यात आले. बरॅकमधील इतर कैद्यांना धाक, दहशत निर्माण करुन, टोळीतील पाचजण शनिवारी पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी खिडकीतून बाहेर पडले. बाहेरील लोखंडी जाळी तोडून, कारागृहाची सुरक्षा भेदून पलायन केले.
दरम्यान, कारागृहाच्या समोरच्या बाजूने रखवाली करणार्या पोलीस कर्मचार्यांना कैदी पळाल्याची अजिबात खबर लागली नाही. दोन कैदी नगर-मनमाड रस्ता ओलांडून राहुरी न्यायालयाच्या बाजूच्या रस्त्याने पळतांना पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाला दिसले. पोलीस कॉन्स्टेबल रंगनाथ ताके, दीपक फुंदे, देविदास कोकाटे, विकास साळवे यांनी पळणार्या दोघांचा पाठलाग केला. टोळीप्रमुख सागर भांड व किरण आजबे यांना अवघ्या पंधरा मिनिटांत पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. नंतर पोलिसांना कैद्यांनी पलायन केल्याचे लक्षात आले. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्या ब्रिटीशकालीन राहुरीच्या कारागृहाची सुरक्षित तटबंदी भेदून एकाचवेळी पाच कैद्यांनी पलायन करण्याची पहिलीच घटना आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सकाळी कारागृहाची पाहणी केली. राहुरी पोलीस ठाण्याची पाच व स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी सात पोलीस पथके पळालेल्या तीन गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.