‘स्मरणयात्रा’ हे नात्यांचे महत्त्व सांगणारे पुस्तक ः तांबे पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना एकत्रित येऊन स्वतः लिहिलेल्या लेखसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित करणे ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. या पुस्तकात ज्या-ज्या नात्यांबद्दल लिहिलंय ते मनाला हळवं करणारं आहे. कुटुंबातील आणि समाजातील विविध नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारं आणि नात्याचं महत्त्व सांगणार ‘स्मरणयात्रा’ हे पुस्तक आहे, असे गौरवोद्गार संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी काढले.
‘स्मरणयात्रा’ या मृत्यूलेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते आदी उपस्थित होते. येथील पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या व संपादित केलेल्या नातेवाईक, मित्र किंवा इतर आप्तेष्टांवर लिहिलेल्या मृत्यूलेखांचे ‘स्मरणयात्रा’ या लेखसंग्रहाचे सोमवारी (ता.12) महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात प्रकाशन करण्यात आले.
प्रा. डॉ. अनुश्री खैरे, नितीन सूर्यवंशी व अर्चना साळुंके यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, पुणे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे संगमनेर महाविद्यालयाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचा एक वेगळा लौकिक निर्माण झाला आहे. हा अभ्यासक्रम म्हणजे केवळ पत्रकारिता करू इच्छिणार्यांसाठीचा अभ्यासक्रम नाहीये तर ज्यांना मराठीत अधिक चांगले व्यक्त होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठीही हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. स्मरणयात्रा पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, या पुस्तकातील व्यक्तिचित्रे भलेही कुणाला फारशी परिचित नसतील. परंतु त्यांचा जीवनपट वाचताना त्या माणसांचे मोठेपण अधोरेखित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, हे पुस्तक राज्यातील आणि देशातील पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एक नवी दिशा देणारे ठरेल. हा उपक्रम म्हणजे महाविद्यालयाच्या लौकिकात भर घालणारा उपक्रम आहे. महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सिन्नर येथील शिक्षिका मनीषा उगले यांची महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल व श्यामसुंदर कुलकर्णी यांनी शिवराज थोरात याच्या विश्वविक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून संगमनेर ते इंदोर हा 500 किलोमीटरचा प्रवास 24 तासांत पूर्ण केला याबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘अमेरिकेचे सत्ता हस्तांतरण’ या विषयावर केलेल्या प्रकल्पांपैकी सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणार्या नितीन सूर्यवंशी, मिलिंद औटी, एस. एम. खेमनर, गणेश गुंजाळ व अमोल वाघमोडे यांच्या समूहाचा विशेष सन्मान करण्यात आला. तर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या माहितीपट निर्मिती प्रकल्पातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणाबद्दल दत्ता शेणकर, विनय निसाळ, वैष्णवी खेडलेकर, ऋतुजा पुरी, गीतांजली पवार व मयूरी गोडगे यांच्या समूहाचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, लेखक सुधीर ब्रह्मे, नगरसेविका रुपाली औटी, किशोर पेटकर, जिजाबा हासे, रवींद्र नेहे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकारिता अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले तर एस. एम. खेमनर यांनी आभार मानले.