राहाता पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांची पाठ सभा तहकूब; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण

नायक वृत्तसेवा, राहाता
अहिंसा स्तंभाच्या मुद्द्यावरून जातीय वाद निर्माण होऊ नये आणि शहरात जातीय सलोखा राहावा. यासाठी राहाता नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली आहे. अवघे दोन नगरसेवक उपस्थित असल्याने सभा तहकूब करावी लागली. पहिल्यांदाच असे घडल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. या सभेला नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा व नगरसेविका विमल आरणे हे तिघेच उपस्थित राहिल्याने सभा तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्षांवर आली. गुरुवारी होणार्‍या सर्वसाधारण सभेत 1 ते 10 विषय सभेपुढे ठेवण्यात आले होते. त्यात विषय क्रमांक 9 हा अहिंसा स्तंभाची जागा बदलून जागा निश्चित करण्याबाबत तर विषय क्रमांक 10 राहाता शहरातील रस्ते, चौक, जॉगिंग ट्रॅक, नगरपरिषदेत सभागृह व प्रवेशद्वारास नाव देण्याबाबत होता. या मुख्य दोन विषयांबाबत नगरसेवकांना कुठलीही माहिती दिली नाही व विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आम्ही सभेस गैरहजर राहिलो, असा सूर नगरसेवकांनी लावला आहे.

नगराध्यक्षांनी कुठली कल्पना न देता चौकात अहिंसा स्तंभासाठी जागा निश्चित केली. त्यामुळे शहरात जातीय सलोखा बिघडत आहे. वीरभद्र मंदिरासमोर अहिंसा स्तंभ उभा राहावा, अशी पिपाडा यांची कल्पना आहे, परंतु याठिकाणी शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांचे मंदिर असल्याने अहिंसा स्तंभासाठी ही जागा संयुक्त नाही. शहरात जातीय तिढा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही सभेला अनुपस्थिती दर्शवली, असा सूर अनुपस्थितीत नगरेसवकांमध्ये दिसून आला. राहाता शहरातील रस्ते, चौक, जॉगिंग ट्रॅक, बगीचा, नगरपरिषद सभागृह प्रवेशद्वार यांना नाव द्यायचे असे सर्वसाधारण सभेच्या अजंठ्यात म्हटले आहे. परंतु नाव कोणाचे द्यायचे याची पूर्वकल्पना नगरसेवकांना देण्यात आली नाही. हे आम्हाला मान्य नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले.


पिपाडा यांनी नगरपरिषदेच्या खर्चातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणला. त्या पुतळ्यात अनेक त्रुटी असल्यामुळे सदर पुतळा बसवण्यासाठी योग्य नाही असा लेखी शेरा देण्यात आला आहे. सदर पुतळा परत करून त्यासाठी देण्यात आलेले पैसे व्याजाच्या रकमेसह संबंधितांकडून वसूल करण्यात यावेत. पुतळ्यासंदर्भातील फाईल गहाळ झाली असून याबाबत तक्रारही दाखल केली आहे.
– साहेबराव निधाने, नगरसेवक

अहिंसा स्तंभ वीरभद्र मंदिरासमोर करणार अशा खोट्या अफवा आमचे विरोधक जाणीवपूर्वक फसरवित असून अहिंसा स्तंभ वीरभद्र मंदिरासमोर बसविणार नाही. विरोधकांनी दिशाभूल केली तरी काही फरक पडणार नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. काही नगरसेवकांची अडचण आम्ही समजू शकतो ते बैठकीला आले नाहीत. परंतु काही लोक 5 वर्षांच्या पराभवाच्या दुःखातून अजूनही सावरू शकले नाहीत. जनतेच्या लक्षात राहतील अशी विकासकामे आमच्या कार्यकाळात केली. परंतु काही लोक फक्त पत्रकबाजी करण्यात समाधान मानतात. त्यांचे योगदान काय आहे याचे आत्मपरीक्षण ते करायला तयार नाहीत.
– ममता पिपाडा, नगराध्यक्षा

Visits: 100 Today: 2 Total: 1112299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *