मुर्शतपूरमध्ये अवकाळी पावसाने उडाली दाणादाण मारुती मंदिराचे पत्रे उडाले तर झाडाची फांदी पडून एक मुलगी जखमी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील मुर्शतपूरमध्ये गुरुवारी (ता.14) रात्री वादळी वार्यासह पाऊस झाला. मंडपी परिसरात असलेल्या मारुती मंदिरावरील पूर्ण पत्र्याचे शेड उडून गेले तर लोकवस्तीत राहत असलेल्या पाच घरांची पडझड झाली. या वादळाने गावठाणातील लिंबाच्या झाडाची फांदी पडून रूपाली शंकर बर्डे ही पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

गुरुवारी रात्री मुर्शतपूर परिसरात अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कमी होता. मात्र विजेचा कडकडाट आणि वादळाचे प्रमाण जास्त होते. मंडपी शिवारात असलेले मारुती मंदिर या वादळाने बाधित झाले असून मंदिराभोवती असलेल्या भिंती तसेच मंदिरावर असलेले पत्र्याचे शेड उडाले. घरकुलात राहत असलेल्या दोन कुटुंबांसह आणखी तिघांच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच भिंती पडूनही नुकसान झाले. हिराबाई पवार, अन्सार पठाण, दादासाहेब ढोले, अप्पासाहेब सोनवणे, दिलीप गिरमे यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आलाय.

गावठाणातील शंकर बर्डे हे रात्री घरात झोपलेले असताना अचानक वारा सुटला. घराच्या वर असलेली बाभूळ पडून काही होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबाला बरोबर घेत बाहेर आश्रय घेण्याचे ठरविले. मात्र विजेचा कडकडाट होताच अ़ंगणातील लिंबाच्या झाडाची फांदी अचानक तुटली व ती रुपाली बर्डे हिच्या पायावर पडली. त्यात ती जखमी झाली आहे. तिच्यावर शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच साधना दवंगे, विष्णू शिंदे, डॉ. अनिल दवंगे, काका शिंदे, सुनील दंवगे, रोहिदास मोरे, संतोष गोसावी, विजय गायकवाड, अक्षय धुळे घटनास्थळी दाखल झाले. डॉ. अनिल दंवगे यांनी तातडीने आमदार आशुतोष काळे यांना या घटनेची माहिती दिली. महसूल विभागामार्फत या घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी काळे यांनी सूचना केली. तलाठी धनंजय पराग व ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचार्यांनी बाधित झालेल्या घरांचा व मारुती मंदिराच्या उडालेल्या छताचा पंचनामा केला आहे.
