बेलापूर येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी रास्ता रोको आरोपीस तत्काळ अटक करावी आणि तपास गुन्हे शाखेस देण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने पळवून नेले. याप्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करावी, तसेच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यासाठी येथील महाराणा प्रताप संघटनेतर्फे बेलापुरात शुक्रवारी (ता. 13) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संदर्भात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बेलापूर येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावत खोटे आमिष दाखवून बेलापूर गावातील एका तरुणाने पळवून नेले. या घटनेला अनेक दिवस उलटून गेले असून, पोलिसांना अद्याप फरार आरोपीचा शोध लागलेला नाही. याबाबत शुक्रवारी येथील महाराणा प्रताप संघटनेतर्फे बेलापूर येथील नगर बाह्यवळण मार्गासमोर रास्ता रोको करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलकांनी घटनेचा निषेध करून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा व भाजप ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी देखील संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ व भाजपच्या पुष्पलता हरदास यांची भाषणे झाली. आंदोलनात राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर, चार दिवसांत आरोपीस अटक न झाल्यास गाव बंद ठेवण्याचा इशारा देत आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय सानप, हवालदार अतुल लोटके, रामेश्वर ढोकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

Visits: 4 Today: 1 Total: 29455

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *