नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार सात-आठ गंभीर जखमी; मृतांमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश


नायक वृत्तसेवा, राहुरी
गुहा ते चिंचोली दरम्यान गुरुवारी (ता.17) रात्री साडेसात वाजता अहमदनगर-मनमाड महामार्गावर कंटेनर, क्रुझर जीप व दोन दुचाकी अशा चार वाहनांचा भीषण अपघात घडला. जीपमध्ये शिर्डीवरुन शिंगणापूरला चाललेले साईभक्त होते. जीपमधील तीनजण जागीच ठार झाले तर सात-आठ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

शिर्डीवरुन नऊ भाविकांना घेऊन जीप (एमएच.20, एफजी.1401) शनिशिंगणापूर येथे चालली होती. तर, कंटेनर (एचआर. 45, बी.4470) मनमाडच्या दिशेने चालला होता. अहमदनगर-मनमाड महामार्गावर सहापदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने, गुहा येथे एका बाजूने रस्ता बंद करून, एकेरी वाहतूक चालू होती. त्यामुळे, जीप व कंटेनरची समोरासमोर भीषण धडक झाली. कंटेनर व जीप रस्त्याच्या खाली उतरले.
दरम्यान, कंटेनर-जीपची धडकेत दोन दुचाकी सापडल्या. दुचाकी (एमएच.15, एचबी.9574) वरील एकजण गंभीर, तर एकजण किरकोळ जखमी झाले. दुसर्‍या दुचाकीवरील एकजण किरकोळ जखमी झाला.

जीपमध्ये सातजण मध्य प्रदेशमधील होते. पुष्पा जयस्वाल (रा. सेलूल, मध्य प्रदेश) जागीच ठार झाल्या. इतर दोन मृतांची नावे समजली नाहीत. जीप चालक रमेश घोडके (मूळ रा. मंठा, जि. जालना, हल्ली रा. शनिशिंगणापूर), जीपमधील पाचजण गंभीर जखमी असल्याचे समजते. त्यांची नावे समजली नाहीत. या अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना चार रुग्णवाहिकेतून राहुरी व अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती. रात्री साडेनऊ वाजता अपघातग्रस्त वाहने काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Visits: 17 Today: 1 Total: 116186

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *