सावधान; संगमनेरात आता कार चोरीचे सत्र! एका रात्रीतून शहर हद्दीतील दोन चारचाकी वाहने झाली लंपास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वातावरणात थंडीचा अंमल वाढण्यासोबतच चोरी, दरोडे, लूट अशा घटनाही हळूहळू वाढू लागल्या आहेत. यात आता चक्क दारासमोर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांचीही भर पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. संगमनेरात यापूर्वी दुचाकी वाहन चोरीच्या घटना नियमित होत्या. मात्र चोरट्यांनी गुरुवारच्या एकाच रात्रीतून शहरातील विविध भागातील दोन चारचाकी वाहने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची पोलिसांनी गांभिर्याने दखल घेतली असून लवकरच या टोळीचा पर्दाफार्श करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. या घटनेने दारासमोर उभी असलेली आपली चारचाकी वाहनेही आता असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चारचाकी वाहनांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसही काहीसे चक्रावले होते. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी अभावाने घडलेली अशी घटना एकाचवेळी दोन ठिकाणांवर घडल्याने याबाबत तत्काळ वरीष्ठांना कळविण्यात आले. रहदारीच्या अकोले नाका परिसरातून चोरट्यांनी बोलोरो लांबविल्याचे समोर आले आहे. हे वाहन ज्याठिकाणी लावण्यात आले होते, तेथे एक बेवारस दुचाकीही आढळली आहे. ती देखील चोरीचीच असण्याची शक्यता असून हेरुन ठेवलेल्या वाहनापर्यंत पोहोचण्यासाठीच त्याचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. सदरचे वाहन प्रकाश सूर्यवंशी यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे, मात्र वृत्तलिहेपर्यंत त्यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.
दुसरी घटना शहरालगतच्या रहाणेमळा परिसरातून समोर आली आहे. या भागात राहणारे शिक्षक विठ्ठल कडूस्कर यांच्या बंगल्याच्या दारासमोर उभे असलेली स्वीफ्ट डिझायर (क्र.एम.एच.17/बी.व्ही.4301) हे वाहन चोरट्यांनी लांबविली. याबाबत त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या दोन्ही घटना दाट लोकवस्तीच्या भागात घडल्या आहेत. अकोले नाका परिसरात रात्री उशीरापर्यंत वर्दळ सुरु असते. पहाटेही फिरायला जाणारी बहुतेक मंडळी याच भागातून जात असल्याने हा परिसर वर्दळीचा समजला जातो. शहराची वाढ होतांना घुलेवाडी, गुंजाळवाडी परिसरात लोकवस्ती वाढली. त्यात रहाणेमळा हा भाग सर्वात आधी लोकांच्या निवासात गजबजला. या भागातून चोरट्यांनी चारचाकी वाहन लांबविले.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित यापूर्वी दुचाकी वाहन चोरीच्या घटना नियमित होत्या. यापूर्वी अभावाने चारचाकी वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. आज मात्र एकाचवेळी दोन वाहने चोरीला गेल्याचे समोर आल्याने पोलिसही सावध झाले आहेत. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह परिसराची पाहणी करुन तपासासाठी पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्हींचाही तपासात वापर केला जात आहे. लवकरच या गुन्ह्याचा तपास करु असा पोलिसांना विश्वास आहे. मात्र एकाचवेळी घडलेल्या या दोन घटनांनी आपल्या दारासमोर लावलेली आपली चारचाकी वाहनेही चोरट्यांपासून असुरक्षित असल्याची भावना संगमनेरकरांच्या मनात निर्माण झाली आहे.