निलंबित जिल्हा शल्यचिकित्सकांची अटकेनंतर जामिनावर सुटका जिल्हा रुग्णालय आग दुर्घटना प्रकरण; हलगर्जीपणाचा ठपका

नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात लागलेल्या आग प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलेले निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना सोमवारी (ता.28) अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालयाने त्यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मंजूर केलेला असल्याने अवघ्या काही मिनिटांतच त्यांची जामिनावर सुटकाही झाली. घटना घडली तेव्हा विविध संस्था संघटनांनी आणि नागरिकांनी त्यांच्याकडे बोट दाखविले होते. सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनेही आग प्रकरणात डॉ. पोखरणा यांचा हलगर्जीपणा दिसत असल्याचा ठपका ठेवला होता. 14 जणांचा बळी घेतलेल्या आगीच्या घटनेनंतर मोठ्या कालवधीनंतर ही कारवाई झाली. तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी कारवाईचे सोपस्कर पार पाडले.

जिल्हा रुग्णायातील करोना अतिदक्षता विभागात सात नोव्हेंबरला आग लागली होती. यामध्ये सुरुवातीला 11 जणांचा तर नंतर झालेले मृत्यू मिळून एकूण 14 जणांचा बळी गेला. याप्रकरणी त्याचवेळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये चौघांना अटक करण्यात आली होती. तर आरोग्य विभागाने डॉ. पोखरणा यांच्यासह सहा जणांना निलंबित केले होते. मधल्या काळात डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या अटकेवरून मोठा वादही निर्माण झाला होता. पोखरणा यांच्या अटकेची मागणी केली जात होती. मात्र, डॉ. पोखरणा यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.

सरकारने या आगीची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल वेळेत सादर केला होता. मात्र, सरकारकडे बराच काळ तो प्रलंबित होता. मधल्या काळात पोलिसांना तांत्रिक माहिती उपलब्ध न झाल्याने गुन्ह्याचा तपासही प्रलंबित होता. आता हा चौकशी अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यामध्ये डॉ. पोखरणा यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे उपअधीक्षक कातकडे यांनी डॉ. पोखरणा यांना चौकशीला बोलाविले. त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर लगेचच अटकपूर्व जामीन न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार पोखरणा यांची सुटका करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *