कोलते खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता! ओढून-ताणून पुरावे तयार केल्याचा आरोपी पक्षाकडून बचाव

नायक वृत्तसेवा, शेवगाव
येथील पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पिन्या उर्फ सुरेश भरत कापसे याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये ही घटना घडली होती. समन्स बजावण्याच्या कामासाठी गेलेल्या कोलते यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचा कापसे याच्यावर आरोप होता. मात्र, न्यायालयात तो सिद्ध होऊ शकला नाही. पोलिसांनी आरोपींविरोधात ओढून-ताणून पुरावे तयार केल्याचा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला.

त्यावेळी ही घटना खूप गाजली होती. घटनेनंतंर आरोपी दीड वर्षे फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेने आटोकाट प्रयत्न केले होते. नगर, बीड, जालना व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत गुन्हे दाखल असलेल्या कापसेविरूद्ध बीड जिल्ह्यात मोक्काही लावण्यात आला होता. शेवगाव तालुक्यातील पोलिसाच्या खून प्रकरणाचा निकाल नुकताच लागला. न्यायालयाने आरोपी कापसे याच्यासह दत्ता विघ्ने व संतोष बोबडे यांची निर्दोष मुक्तता केली.

आरोपींतर्फे अ‍ॅड.सतीश गुगळे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी तपासातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. घटनेच्या वेळी पोलीस कर्मचारी कोलते हे कर्तव्यावर हजर होते. याबाबतचा पुरावा हा संशयास्पद आहे. त्यांनी घटनेवेळी दिलेला त्यांचा मृत्यूपूर्व जबाब संशयास्पद व अविश्वासपात्र आहे, असा बचाव त्यांनी केला. पोलिसांनी पुरावे बनावट पद्धतीने सादर केलेले आहेत. केवळ पोलीस कर्मचार्‍याचा खून झाला या कारणाने आरोपींविरुद्ध पुरावे तयार करण्यात आल्याचेही गुगळे यांनी न्यायालयात बचाव करताना सांगितले. हे मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींची सुटका केली.

यातील आरोपी कापसे हा वाळू तस्करीशी संबंधित आहे. त्याच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. 3 फेब्रुवारी, 2015 रोजी कोलते मुंगी गावाच्या शिवारात गेले होते. त्यावेळी कोलतेंवर हल्ला करून त्यांचा खून केल्याचा आरोप कापसेवर होता. या प्रकरणाचा पोलिसांनी पूर्ण ताकदीने तपास केला. उल्लेखनीय बाब म्हणजे तपासादरम्यान करण्यात आलेल्या महत्वाच्या पंचनाम्यामध्ये सर्व शासकीय पंच पोलिसांनी घेतलेले होते. प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने आरोपींना शेवटपर्यंत नाशिक कारागृहात ठेवण्यात आलेले होते. अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती. परंतु सुनावणी दरम्यान आरोपीच्यावतीने अ‍ॅड.सतीश गुगळे यांनी पोलिसांनी सादर केलेले पुरावे हे पोकळ व अविश्वासपात्र असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.

Visits: 155 Today: 2 Total: 1103548

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *