गुरुवारपासून साईंच्या मुखदर्शनाची व्यवस्था सुरू साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना गुरुवारपासून (ता.16) सकाळी 6.30 ते रात्री 9.30 यावेळेत आरतीच्या वेळेव्यतिरिक्त मुखदर्शन व्यवस्था सुरू करण्यात येत असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी बानायात म्हणाल्या, देश व राज्यात आलेल्या कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने 5 एप्रिल, 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार 7 ऑक्टोबर रोजी सुमारे 15 हजार भाविकांना ऑनलाईन पासेसद्वारे श्रींची दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून ऑफलाईन पासेसद्वारे 10 हजार भाविकांची अशी एकूण 25 हजार भाविकांची दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आलेली असून प्रतितास 1 हजार 150 भाविकांना श्रींच्या दर्शनाकरीता सशुल्क व निशुल्क ऑफलाईन पासेस देण्यात येतात. त्यामुळे गर्दीच्या काळात अनेक भाविकांना दर्शन पास मिळत नसल्याने साईभक्तांकडून वारंवार मुखदर्शन सुरू करण्याची मागणी होत होती.

तसेच 24 डिसेंबर ते 3 जानेवारी, 2022 अखेर नाताळ व नववर्षारंभ असल्याने भाविकांची होणारी संभाव्य गर्दी व साईभक्तांची मागणी लक्षात घेवून 16 डिसेंबरपासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 यावेळेत (आरतीच्या वेळेव्यतिरिक्त) मुख दर्शन चालू राहील. तरी सर्व साईभक्तांनी कोविड नियमांचे पालन करुन श्रींच्या मुखदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 114880

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *