‘कॅरेट मॅन’ तुकाराम दातीर यांचा गाजर उत्पादनात विक्रम 30 गुंठे क्षेत्रातून 60 क्विंटल गाजराचे उत्पादन काढून 90 हजार कमावले

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील गणोरे येथील तुकाराम मुरलीधर दातीर यांनी 30 गुंठे क्षेत्रातून 60 क्विंटल गाजराचे विक्रमी उत्पादन काढले आहे. मागील चाळीस वर्षांपासून ते उपजीविकेसाठी शेती आणि पशुपालन हा व्यवसाय करत आहेत. निम्नबागायती दोन एकर वडिलोपार्जित शेती ते कसतात. शेतामध्ये काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. त्यातूनच त्यांनी ही किमया साधली आहे.

आपल्या शेतीत ते पूर्वी मका, बाजरी, गहू, हरभरा इत्यादी पारंपारिक पिके ते घेत असे. त्यानंतर आढळा धरणाच्या शेतीसाठी पाणी मिळायला लागल्यापासून वालवड, भोपळा, भुईमूग, कांदे, ऊस अशी पिके ते आलटून पालटून घेत आहे. सर्वात प्रथम त्यांनी 1990 साली गाजर शेतीला प्रारंभ केला. हमखास मिळणारा बाजारभाव आणि जनावरांना चारा या दोन्ही गोष्टी गाजर पिकातून साध्य होत असल्याने गाजराचे पीक सातत्याने आपल्या शेतावर घेत आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून गाजराचे पीक हे अत्यल्प खर्चात आणि कमी मेहनतीने पिकवता येते. गाजर पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते हलकी जमीन ते निवडतात. मुंबई बाजारपेठेत मागणी असलेले न्यू सिन करोडा वाण ते लागवडीसाठी निवडतात. चालू हंगामातही त्यांनी तीस गुंठे क्षेत्रासाठी 800 ग्रॅम बियाणे मागवले होते.

मोसमी पाऊस झाल्यावर नांगरणी, वखरणी, पाळी ही जमीन मशागतीच्या कामे करून एक फूट अंतरावर सरी पाडून त्यांनी क्लॉज भाजीपाला बियाणे निर्मिती करणार्या कंपनीचे 7 जुलै, 2021 रोजी बियाणांची पेरणी केले होते. पीक एक महिन्याचे झाल्यावर गोल आणि टरगा सुपर हे तणनाशक तीस गुंठे क्षेत्रात प्रत्येकी 15 आणि 20 मिली. पंधरा लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी केली. पीक दीड महिन्याचे झाल्यानंतर पिकाची खुरपणी केली. मशागत करताना शेतामध्ये शेणखत चार ट्रॉली मिसळून दिले होते. वर खताची मात्रा देताना 10: 26: 26 हे खत 50 किलोची एक गोण दिली. पावसाचा अंदाज घेऊन व जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन गरजेनुसार आठवड्याला पाण्याच्या पाळ्या दिल्या. दोनवेळा विहिरीचे पाणी देण्यात आले. नेहमी चार महिन्यात काढणीला येणारे गाजराचे पीक यंदा मात्र पावसामुळे लांबणीवर गेले.

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही पाऊस झाल्यामुळे गाजर सडू शकतात अशी त्यांना काळजी लागली होती. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर बहरून आलेले पीक हातातून जाते की काय अशीही चिंता त्यांना वाटली. मात्र पावसाने उघडीप दिल्यावर त्यांनी परिसरातील रोजंदारीवर येणार्या महिला मजूर घेऊन युद्धपातळीवर गाजराची काढणी सुरू केली. सहाव्या महिन्यातही गाजरे एवढा पाऊस होऊन खराब झाली. रोज 3-4 क्विंटल गाजरं मुंबईला विक्रीस गाडीने पाठविले. आत्तापर्यंत जवळपास 60 क्विंटल माल त्यांनी मुंबईला विकला आहे. म्हणजेच 30 गुंठे क्षेत्रात विक्रमी 60 क्विंटल गाजराचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. सरासरी पेक्षा आणि विद्यापीठाच्या नोंदी पेक्षाही हे उत्पन्न अधिक आहे. विद्यापीठाच्या नोंदीनुसार एकरी चार टन उत्पन्न मिळणे अपेक्षित असते. त्याऐवजी सहा टन उत्पन्न त्यांनी घेतले आहे. तीस गुंठे क्षेत्रामध्ये सहा टन गाजराचे उत्पन्न काढून त्यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. आजूबाजूच्या गावातील शेतकरी कुतूहलाने या प्रयोगाकडे बघत असून सर्वत्र त्यांचा बोलबाला आहे. तीस गुंठे क्षेत्रातून त्यांना आत्तापर्यंत झालेल्या विक्रीतून 90 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. खर्च वजा जाता 70 हजार रुपये त्यांना मिळाले आहेत. याशिवाय जनावरांसाठी दर्जेदार व पौष्टिक चाराही उपलब्ध झाला आहे.
