बलात्कारासह ‘पोस्को’तील फरार आरोपीस ठोकल्या बेड्या! तीन वर्षांपासून फरार; राजूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी पट्ट्याला हादरवून सोडणार्‍या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. राजूर पोलिसांनी नुकत्याच आरोपीस बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

आईवडील बाहेरगावी गेलेले असताना अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेवून सहा आरोपींनी बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदर गुन्ह्यातील पाच आरोपींना गुन्हा घडल्यानंतर तत्काळ अटक केली होती. त्यातील एक आरोपी कृष्णा उर्फ किसन आत्माराम उकले (रा.घाटघर, ता.अकोले) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्यावर राजूर पोलिसांत 12 ऑगस्ट, 2028 रोजी गुरनं. 52/2018 भादंवि कलम 376, 376 (2), (आय), (एन), 506 सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5 (जे) (2) (एल) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता.10) रात्री जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या आदेशाने फरार व आवश्यक आरोपींचा शोध घेण्यासाठी ‘ऑल आउट’ ऑपरेशन राबविण्यात आले. या अंतर्गत वरील गुन्ह्यातील फरार आरोपी कृष्णा उर्फ किसन उकले हा घाटघर येथे मिळून आला. त्याच्या मुसक्या आवळून न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता.14) पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोना. दिलीप डगळे, पोकॉ. अशोक काळे, अशोक गाढे, विजय फटांगरे यांनी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नितीन खैरनार हे करीत आहेत.

Visits: 165 Today: 1 Total: 2120541

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *