शिवसेना-काँग्रेसचे इच्छुक अजूनही मुलाखतीच्या प्रतीक्षेत अकोले नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी; भाजपच्या मुलाखती पूर्ण

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी 7 डिसेंबर आहे. मात्र, 3 डिसेंबरपर्यंत एकही अर्ज दाखल नव्हता. भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र शिवसेना आणि काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नसल्याने या पक्षाचे इच्छुक उमेदवार मुलाखतीच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर अकोल्यात भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये ऐनवेळेस आलेले डॉ. किरण लहामटे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आमदार डॉ. लहामटे, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येत भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखताना दिसत आहे. तर माजी आमदार वैभव पिचड हे देखील आपल्या ताब्यातील नगरपंचायत पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी स्वबळाचा नारा देत उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन उमेदवारांची चाचपणी करत आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या, त्यात सुमारे 40 इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावत मुलाखती देत आपणच या निवडणुकीत विजयी होऊन असा स्पष्ट शब्द देत आहेत. तर काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीचा आग्रह धरला.

आमदार लहामटे यांनी स्पष्ट केले, की अकोले शहरासाठी यापूर्वी कोणताही निधी न मिळाल्यामुळे मूलभूत प्रश्न जैसे थेच राहिले आहेत. आता मात्र आमदार निधीतून अडीच कोटी तर राज्य सरकारकडून दहा कोटींचा विकासकामासाठी निधी देण्यात आला आहे. परंतु प्रभागात चांगलं काम करणारा व जनाधार असलेला उमेदवार देणार असल्याचे सांगितले. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जोरदार शक्तीप्रदर्शन करत इच्छुक उमेदवारांनी माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, महिलाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, कैलास वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्या. परंतु यामध्ये उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सचिन शेटे व काही नगरसेवकांच्या सौभाग्यवतींनीही मुलाखती दिल्या. यावेळी ह्या निवडणुकीत सर्व प्रभागांत आपला विजय निश्चित आहे. सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, शिवसेना पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी (ता.4) घेणार असून राज्यात तीन पक्षांचे सरकार असून तोच फॉर्म्युला अकोले नगरपंचायत ठेवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविल्यास भाजपाचा हातून नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात नक्कीच घेऊ असा विश्वास शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नियोजनाची बैठक संपन्न झाली. तालुकाध्यक्ष दत्ता नवले, शहराध्यक्ष ललित नवले, हर्षद गुजर, हर्षल बानाईत आदिंनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या व विजयाचा दावा केला आहे. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्य सचिव विजय वाकचौरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्षेत्रात काम करणारे प्रमुख व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. इच्छुकांना पक्षाने संधी द्यावी, ज्या प्रभागात रिपब्लिकन पक्षाला मानणारे, किंवा त्या-त्या प्रभागातील प्रबळ उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. तर रिपाइंचे नेते शांताराम संगारे यांनी सांगितले, की रिपाइंकडे मतदार संख्या कमी असली तरी ती मते सत्ता परिवर्तन घडवून आणणारी आहेत.

नगरपंचायतच्या निवडणुकीला काही दिवसांचा कालावधी राहिल्याने 17 प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाचा जोगवा मागताना दिसत आहे. या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये कोण कोणासाबत युती करणार की आघाड्यांमध्ये बिघाड्या होणार यावरचं सर्व पक्षांतील इच्छुक उमेदवारांच्या गळ्यात नगरपंचायतीच्या उमेदवारीची माळ पडणार अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. परंतु शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अद्यापही झाल्या नसल्याने काँग्रेस व शिवसेनेच्या निर्णयाकडे पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहेत. परंतु अकोले तालुक्यातील स्थानिक राजकारणात दिवसागणिक बदल घडताना दिसून येत आहे हे निश्चित.
