डॉक्टरकीचं शिक्षण सोडून पोलिसाचा मुलगा बनला सराईत गुन्हेगार! सागर भांड टोळीविरुद्ध ‘मोक्का’ची कारवाई; पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके करणार तपास

नायक वृत्तसेवा, राहुरी
वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून सराईत गुन्हेगार बनलेल्या सागर अप्पासाहेब भांड (वय 28, रा. ढवणवस्ती, नगर) याच्यासह त्याच्या टोळीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. विशेष म्हणजे भांड हा पोलिसाचा मुलगा आहे. त्याचे वडील पुणे जिल्हा पोलीस दलात होते. पैशांच्या मोहामुळे सागर गुन्हेगार बनला. टोळी तयार करून फसवणूक, रस्ता लूट आणि दरोड्याचे गुन्हेही त्याने केले. एकदा त्याला अटक झाली. जामिनावर सुटल्यावर त्याने गुन्हे सुरू केले. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला.

सागर भांड (टोळी प्रमुख), रवी पोपट लोंढे, नीलेश संजय शिंदे, गणेश रोहिदास माळी, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, रमेश संजय शिंदे या टोळीविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आहे. या टोळीचा प्रमुख असलेल्या भांडविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 32 गुन्हे दाखल आहेत. तो बीएचएमएस या वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत होता. पुढे त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि गुन्हेगारीच्या मार्गाला लागला. मधल्या काळात त्याने लग्नही केले होते. त्याचे हे प्रताप पाहून पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले.

2016 मध्ये त्याला रस्तालुटीच्या एका गुन्ह्यात अटक झाली होती. त्यात त्याला जामीन मिळाला. मात्र, बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून तो फरारी झाला होता. 2018 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे होते. जामिनावर सुटल्यावर त्याने गुन्हेगारी सुरूच ठेवली. टोळीच्या मदतीने महामार्गावर वाहने अडवून चालकांना लुटण्याचे गुन्हे तो करीत होता. मात्र, पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

मधल्या काळात राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. राहुरी येथील मयूर दिलीप देवकर यांना शस्त्राचा धाक दाखवून भांड याच्यासह त्याच्या टोळीने लुटले होते. त्यामध्ये त्याच्या टोळीला अटक करण्यात आली. मात्र, पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याची या टोळीची पद्धत लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) प्रस्ताव तयार केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत तो नाशिकला पाठविण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भांड याच्या टोळीविरुद्ध या कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत.

Visits: 137 Today: 1 Total: 1107200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *