जिल्ह्यात 42 बसच्या माध्यमांतून प्रवाशांना सेवा! कोपरगाव, शेवगाव व तारकपूरमधून धावताहेत बसेस
नायक वृत्तसेवा, नगर
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्यानुसार एसटीचा कारभार अविरतपणे सुरू होता. विविध मागण्यांसाठी कर्मचार्यांनी आंदोलन हाती घेतल्याने सध्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. कर्मचार्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या असून काही मान्य न झाल्याने काम बंद आंदोलन सुरू आहे. एसटी प्रशासनाच्या आवाहनाला अहमदनगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळालेला असून 42 बसच्या माध्यमांतून सध्या प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे.
गेल्या सव्वा महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज अखेरपर्यंत एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे 18 कोटींचे नुकसान झाले आहे. एसटी कर्मचार्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. तरीही कर्मचारी राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे दर्जा मिळावा व विलगीकरण करून घ्यावे, या मागणीवर ठाम राहिल्याने आंदोलन चिघळत गेले आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने काही कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले. परंतु कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी जे कर्मचारी कामावर तत्काळ हजर होतील, त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे आवाहन केले होते. मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद कर्मचार्यांकडून मिळाला नाही. जिल्ह्यातील कोपरगाव, शेवगाव, व तारकपूर या चार आगारांतून एकूण 42 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यामध्ये कोपरगावमधून चार, शेवगावमधून 32, तारकपूरमधून आठ बसेस रोज धावत आहेत.