समाज माध्यमाचा सदुपयोग; जखमींसाठी गोळा केली मदत! खंदरमाळ येथील तरुणांनी गावातील जखमींच्या मदतीसाठी केले आवाहन..

नायक वृत्तसेवा, घारगाव
समाज माध्यम हा अलिकडे लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. तासन्तास यावर वेळ घालवितात. याम माध्यमातून अनेकदा प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात टीका-टीपण्णीला सामोरे जावे लागते. मात्र, संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळ येथील तरुणांनी समाज माध्यमाचा उपयोग करुन अपघातात जखमी झालेल्या मित्रांना व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली आहे. अद्यापही मदत सुरूच असून, या अनोख्या उपक्रमाचे समाजातून स्वागत होत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, खंदरमाळ येथील अंकुश लेंडे, लहानू लेंडे, गणेश लेंडे, जयराम गोंधे आणि ऋषीकेश शिंदे हे पाचजण कारने जात असताना त्यांचा पारनेर तालुक्यातील शिरसुले फाटा येथे अपघात झाला. यामध्ये जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ शिरुर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेथे उपचार सुरू असून, जखमींना वैद्यकीय खर्चासाठी मदत आवश्यक होती. त्यामुळे गावातील तरुणांसह ग्रामस्थांनी व्हाट्सअ‍ॅपवरील ‘आपला गाव आपला विकास’ ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. त्यानुसर बघता बघता यथाशक्ती ग्रामस्थांनी आर्थिक मदत सुरू केली.


आजपावेतो सुमारे पन्नास हजार रुपयांच्या पुढे मदत जमा झाली आहे. अद्यापही मदत सुरूच असून, इतरांनी देखील खारीचा वाटा म्हणून मदत करावी. दरम्यान, अलिकडे समाज माध्यमाचा वाढता वापर बघता अनेकदा प्रसिद्धीसाठीच मोठा उपयोग होत असल्याचे निदर्शनास येते. परंतु, खंदरमाळच्या तरुणांनी समाज माध्यमाचा सदुपयोग करत आपल्या सहकार्‍यांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी कंबर कसली आहे. मदत करण्यासाठी बापूसाहेब लेंडे (97622017817) व संदीप लेंडे (9730767803) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या अपघातातील जखमी अंकुश लेंडे हा एसटी महामंडळातील मुरुड आगारात कार्यरत असताना त्याच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाले होते. त्यावेळी त्याने प्रसंगावधान राखत तब्बल 54 प्रवाशांचा जीव वाचविला होता. आता, मात्र तोच अपघातात जखमी झाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी आर्थिक मदत करणे गरजेची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *