कोरोना संकटात रक्तदान करणे आवश्यक ः डॉ.कुटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना विषाणूंमुळे गरजूंना रक्ताची अतिशय गरज आहे. शासनासह विविध सामाजिक संस्थांकडून सातत्याने रक्तदान शिबिरे होत आहे. तरीही रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून प्रत्येक वर्गातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत कुटे हॉस्पिटलचे डॉ.प्रदीप कुटे यांनी व्यक्त केले.
संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरच्यावतीने दूधगंगा नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व समनापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त (2 एप्रिल) अनेक वर्षांपासून राबवत आलेले रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी कुटे हॉस्पिटल व अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंचे हिमोग्लोबीन, शुगर, रक्तगट तपासणीसह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने दात्यांनी रक्तदान केले. तसेच हॉस्पिटलमध्ये नव्यानेच डायलिसीसची सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना आता नाशिक, पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही, असेही डॉ.कुटे यांनी सांगितले. यावेळी थोरात कारखान्याचे संचालक तथा दूध उत्पादक विभाग सेासायटीचे अध्यक्ष दादासाहेब कुटे, अर्पण रक्तपेढीचे सेवक, कुटे हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.