डोंगरगावच्या ध्येयवेड्या तरुणांची निसर्गाशी घट्ट मैत्री! गावातील तुकाई माता डोंगरावर फुलविली वनराई

महेश पगारे, अकोले
तालुक्यातील डोंगरगावच्या ध्येयवेड्या युवकांनी वृक्षारोपण व संगोपन करत निसर्गाशी घट्ट मैत्री केल्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. सध्या तुकाई माता गड हा परिसर हिरवाईने नटलेला असल्याने पर्यटकांना खुणावत आहे.

कोरोना काळातील ऑक्सिजनची कमतरता व निसर्गाचे मानवासाठी असणारे अमूल्य योगदान ध्यानात घेत डोंगरगाव येथील तरुणांनी फावल्या वेळेचा सदुपयोग करत तुकाई माता गडावरील परिसरात वृक्षारोपण व संगोपन करण्याचा ध्यास घेतला. या माध्यमातून गडाचे नंदनवन करण्याच्या हेतूने झपाटल्यागत सर्वजण काम करण्यास लागले. त्यानुसार वड, पिंपळ, चिंच, जांभळ, करंजी, बांबू, बेल, अशोका, नारळ अशी सुमारे 90 झाडी लावली. विशेषतः मंडळातील युवकाचा वाढदिवस असला की गडावर पाच वृक्ष लावले जाऊन त्याची देखभालही घेतली जाते. त्यामुळे आज तेथे हिरवाईने वृक्षराजी सजलेली असून जणू भंडारदरा-हरिश्चंद्रगड परिसराचीच अनुभूती देत आहे.

आजतागायत 90 झाडांचे यशस्वी संगोपन केले आहे. त्यासाठी उन्हाळ्यात देखील किटलीने पाणी आणणे, पाचटाचे झाडांना अच्छादन करणे, अंत्यविधी व दशक्रियेतील गाडग्यांचा वापर करून युवकांनी भर उन्हाळ्यात झाडे जगविण्यासाठी परिश्रम घेतले. नंतरच्या कालावधीत नेताजी पतसंस्था, विवेकानंद पतसंस्था, भास्कर गुरुजी व गोरख मधुकर उगले यांनी स्वखर्चाने पाच हजार लिटरची पाण्याची टाकी बांधून दिली. तसेच ग्रामपंचायतच्या सहकार्याने मोटर व पाईपची सुविधा झाल्याने युवकांमध्ये उत्साह संचारला आणि दररोज पहाटे पाच वाजता व्यायामाला आल्यानंतर झाडांना नित्यनेमाने पाणी देतात. ग्रामपंचाययत कर्मचारी लखन माळी, संजय क्षीरसागर व ग्रामस्थ देखील यासाठी झटत असतात. आता येथे हजार झाडे लावण्याचा व संगोपन करण्याचा संकल्प सुनील उगले, रमेश हांडे, शांताराम उगले, विजय कदम, सुरेश उगले, गोरक्ष उगले, योगेश उगले, निवृत्ती सरोदे, गोरख संपत उगले, सतीष उगले, ज्ञानेश्वर उगले, संजय कदम यांच्यासह रोहिणी उगले, सोनाली कदम, वेदांत कदम, ओम कदम, श्रवण उगले, समर्थ उगले, कृष्णा उगले यांनी केला आहे. त्यांच्या पर्यावरण संवर्धन कामाला यानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा!

Visits: 166 Today: 1 Total: 1423669

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *