ऐतिहासिक नगरपालिकेच्या चौकाला सुशोभिकरणाची प्रतीक्षा! शहर विकासासाठी कोट्यावधींचा खर्च; पालिकेचा परिसर मात्र वंचितच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दशकभरापासून एकामागून एक विकासकामांमुळे संगमनेर शहराचं रुपडं पालटतं आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर वृक्षारोपनासह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामेही झाली आहेत. अनेक प्रभागांमध्ये नव्याने उद्यानांची निर्मिती करुन शहरातील मुख्य रस्त्यांवर महामार्गाप्रमाणे पांढरेपट्टेही रेखाटले गेल्याने शहरच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने म्हाळुंगी नदीचा पुल अतिशय आकर्षक पद्धतीने सजविल्याने शहराचा दर्जा वाढला आहे. एकीकडे कोट्यावधींचा खर्च करुन शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यांचा कायापालट होत असतांना दुसरीकडे एकशे साठ वर्षांचा मोठा इतिहास लाभलेल्या खुद्द पालिकेच्या चौकालाच अजून विकासाची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आता परिसरातील व्यापारी व नागरिकांनीच पुढाकार घेतला असून नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना लक्ष घालण्याचे साकडे घालण्यात आले आहे.

संगमनेरच्या म्युनिसिपल कमिटीची स्थापना होवून तब्बल 161 वर्षांचा कालावधी लोटला आहे. सन 1857 साली संगमनेर नगरपरिषद स्थापनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, मात्र त्याचवेळी कानपूरमध्ये ब्रिटीश राजवटीविरोधात सशस्त्र उठाव झाल्याने त्यावेळी तो प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे संगमनेर नगरपरिषदेची प्रत्यक्ष स्थापना होण्यासाठी 1860 साल उजेडावे लागले. स्थापनेपासून आजपर्यंतच्या सोळा दशकांत पालिकेच्या सर्वच प्रमुखांनी आणि सदस्यांनी शहराला विकासाच्या दिशेने नेत संगमनेरकरांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आणि शहराची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे.

सन 2006 साली संगमनेर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच दुर्गा तांबे यांच्या रुपाने पहिल्या महिला नगराध्यक्षा लाभल्या. मधल्या काळातील अडीच वर्षांचा अपवाद वगळता गेल्या एक तपात त्यांनी शहराच्या विकासाची गती वाढवून झपाट्याने शहराचा कायापालट केला. त्यातूनच पालिकेची सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी राहिली, कवी अनंत फंदींच्या नावाने नूतनीकरण झालेले नाट्यगृह उभे राहिले. आज असलेल्या जवळपास सर्वच प्रभागांमध्ये नव्याने उद्यानांची निर्मिती करण्यात आली. प्रवरानदीचा परिसर असेल किंवा म्हाळुंगी नदीचा परिसर या भागाकडेही त्यांनी विशेष लक्ष देवून त्या परिसराचा कायापालट केला. सुमारे सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या येथील गणेशोत्सवासाठी रंगारगल्ली ते गवंडीपुरा मशिदीपर्यंत ट्रिमिक्स पद्धतीचा काँक्रिट रस्ताही तयार झाला.

हरित शहराचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज शहराच्या रस्त्यारस्त्यावर पहायला मिळतात. त्यासोबतच शहरातून जाणार्या कोल्हार-घोटी मार्गाचे नूतनीकरण करताना या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना महामार्गावर असतात त्याप्रमाणे पांढरे पट्टे मारुन शहराच्या बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला कारवाईशिवाय शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरला. असाच प्रयोग त्यांनी अकोले बायपास रस्त्यावरही राबविला. या रस्त्याच्या मधोमध दुभाजकांसह प्रत्येक वळणावर त्यांनी पालिकेच्यावतीने उभारलेल्या आयलँडच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली. सोबतच या सर्व रस्त्यांवर शुभ्र एलईडी दिवेही लावले गेल्याने रात्रीच्या सुमारास शहरातील अंतर्गत भाग महानगरांच्या धर्तीवर चमकू लागला. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागानेही पालिकेच्या प्रयत्नांना हातभार लावतांना म्हाळुंगी पुलाचे सुशोभिकरण केल्याने शहराचे अकोले प्रवेशद्वार देखणे दिसू लागले.

शहर सुशोभिकरणासह पालिकेने संगमनेरातील हिंदू स्मशानभूमी असेल किंवा जुने नेहरु उद्यान असेल अशा ठिकाणीही विकासाचा वारु नेल्याने आज या ठिकाणांनी कात टाकली आहे. गेल्या दशकापासून शहराच्या चौफेर एकामागून एक विकासकामे होत असताना तब्बल 161 वर्षांचा प्रगल्भ इतिहास लाभलेल्या खुद्द नगरपालिकेचा परिसर मात्र या विकासकामांपासून वंचितच राहीला. पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या लालबहाद्दूर शास्त्री चौकाची तर अक्षरशः रया गेली आहे. या चौकात दिवसभर वाहने थांबलेली असल्याने एकप्रकारे संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेचा गळाच घोटला गेला आहे. दुसरीकडे पालिकेच्या प्रवेशद्वारातून जाण्याआधी लागणारा महात्मा फुले चौक तर विकासापासून खूपच मागे राहला आहे.

शहरात सुरू असलेली विकासकामे अशीच सुरू राहावी, मात्र त्यासोबतच ऐतिहासिक पालिकेच्या चौकांचेही सुशोभिकरण व्हावे अशी अपेक्षा आता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यासाठी महात्मा फुले चौकातील व्यापारी व नागरिकांनी एकत्रित येवून वैभवशाली शहराची निर्मिती करणार्या पालिकेने या दोन्ही चौकांचे सुशोभिकरण करण्यासह महात्मा फुले चौकात हायमास्ट दिवे बसवावेत असे साकडे नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना घातले आहे. हा चौक म्हणजे पालिकेची ओळख सांगणारा आहे. या चौकात छोटेखानी आयलँड निर्माण करुन त्यात पालिकेचे प्रतीक चिन्ह (लोगो) लावण्याची मागणी आता पुढे आली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच नगराध्यक्षांची भेट घेणार आहे.

संगमनेर नगरपरिषदेला मोठा इतिहास आहे. जिल्ह्यात आघाडीच्या पालिकांमध्ये समावेश असलेल्या संगमनेर नगरपरिषदेकडून गेल्या काही वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलण्याइतकी कामे झाली आहेत, सध्याही अनेक कामे सुरु असून पालिकेने त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्चही केला आहे. मात्र या विकासकामांपासून पालिकेचाच परिसर वंचित राहिला असून नगराध्यक्षांनी महात्मा फुले चौकाच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घ्यावा यासाठी आम्ही महात्मा फुले चौकातील व्यापारी व रहिवासी त्यांना भेटून मागणी करणार आहोत.
राजेंद्र पवार
व्यापारी – महात्मा फुले चौक

