मुख्याधिकार्यांच्या आडून तांबेंचा महायुतीवर निशाणा! साडेतीन दशकांची निर्विवाद सत्ता; ‘खापर’ मात्र प्रशासकांच्या माथी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापण्याचे स्वप्नं उधळणार्या निवडणूक निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहे. संगमनेरातही त्याची झलक दिसू लागली असून चक्क गेल्या साडेतीन दशकांपासून पालिकेवर अविभाज्य वर्चस्व गाजवणार्या सत्ताधार्यांनीच बुधवारी पालिकेवर मोर्चा नेवून विकास कामांबाबत आवाज उठवला. हा प्रकार राजकीय असला तरीही ज्यांच्या आशीर्वादानेच मुख्याधिकारी विराजमान आहेत, त्यांनीच त्यांच्याविरोधात आंदोलन करावं हे चित्र मात्र संगमनेरात चर्चेचा विषय ठरले. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी ठप्प असलेल्या कामांबाबत रोष व्यक्त केला खरा, मात्र त्याचवेळी सदरचा निधी माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी दिला होता हे सांगायलाही त्या विसल्या नाहीत. विशेष म्हणजे म्हाळुंगी नदीच्या पुलासह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचे खापरही त्यांनी प्रशासकांच्या खांद्यावर उभे राहुन राज्य सरकारच्या माथी फोडले. त्यांच्या या आरोपांना स्थानिक महायुतीकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते याकडे आता संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी (ता.12) शहरात अचंबित करणारा हा प्रकार घडला. सकाळी साडेअकराच्या सुमारास माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे स्थानिक काँग्रेसच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह काही माजी नगरसेवकांना सोबत घेत मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांच्या भेटीसाठी थेट पालिकेत आल्या. यावेळी प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी खड्डे, रस्ते, डास, स्वच्छता या विषयांवर लेखी निवेदन वाचून दाखवत प्रशासकांचे त्याकडे लक्ष वेधले. यावेळी सोबत आलेल्या अन्य कार्यकर्त्यांनीही मुद्द्यांना अनुसरुन सूचना मांडल्या. त्या सर्वांवर प्रशासकांनी अभ्यास करुन कारवाईचे आश्वासन देत तासभर सत्ताधारी आणि त्यांनीच नेमलेल्या स्वतःसोबतच्या आंदोलनाची सांगता केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी शहराच्या आजच्या अवस्थेवर भाष्य करीत प्रशासकांच्या खांद्यावरुन महायुती सरकारवर निशाणा साधला. मुदत उलटून तीन वर्ष झाले तरीही पालिकेच्या निवडणुका नसल्याची खंत व्यक्त करीत 17 डिंसेबर 2021 रोजी उतरलेली पालिकेची पायरी आपण आज चढल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. आपल्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळात आपण नियमितपणे शहरातून फेरफटका मारुन पाहणी करायचो, नगरसेवकांची कामेही त्यावेळी सुरु असायची अशी आठवण त्यांनी करुन दिली. मात्र तीन वर्षांपासून कौंसिलच अस्तित्वात नसल्याने शहराची अवस्था बिकट झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्याचवेळी तीन वर्षांपासून ‘वरचे’ सरकारंही ‘वेगळे’ असल्याचे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासूनच प्रशासक आहे. आपण होतो तेव्हा किती कामे सुरु होती, आज माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निधीतील शंभरावर कामांचे कार्यारंभ आदेश देवूनही त्यांना थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. शहरातील छोट्या-मोठ्या कामांसह, म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी माजीमंत्री थोरात यांनी दिला, मात्र त्याच्या कामात खोडा घातला गेला. जाणूनबुजून कामात दिरंगाई केली गेली. अशा प्रकारचे कामकाज सध्या सुरु असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी महायुती सरकारवर केला.
गेल्या 35 वर्षांपासून पालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता असतानाही त्यातील केवळ 18 वर्षांचा दाखला देत आपल्या काळातील स्वच्छता, 35 ते 40 उद्यानांची निर्मिती, नागरिकांच्या आरोग्य विषयक उपाययोजना यावर प्रकाश टाकतानाच त्यांनी आता प्रशासक असल्याने सर्व कामांना दिरंगाई होत असल्याचे सांगत ‘त्यांच्या’ कामात अडथळे आणले जात असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना प्रशासकांवर खापर फोडायचंय की सरकारवर याबाबत मात्र संभ्रम जाणवला. शहरातील सगळ्याच रस्त्यांवर खड्डे खणल्याचे नमूद करीत माजीमंत्री थोरात यांच्या काळातील शंभर कामांच्या निविदांचे कार्यारंभ आदेश देवूनही ती कामे खोळंबल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. शहरातील भुयारी गटार योजनेचा उल्लेख करताना त्यांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही सरकारने बंद पाडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या उपरांतही आपल्या कार्यकाळात पहिल्या टप्प्याचे काम आपण उरकून घेतल्याचे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहराच्या विकासाचे ध्येय घेवून पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. मात्र त्या निधीतून जी कामं व्हायला हवी होती ती होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छ भारत अभियानात राज्यासह देशातील अनेक बक्षिसे पटकावणार्या पालिकेच्या हद्दित आज रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, धुळ आणि मोकाट जनावरे या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करीत तीन वर्षात शहराचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यातही राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून कशाप्रकारे विकासकामांमध्ये अडथळे आणले जात आहेत हे बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सत्ताधार्यांनीच केलेल्या आंदोलनानंतर माध्यमांसमोर केलेल्या या वक्तव्याची मात्र शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्याला महायुतीकडून कशाप्रकारे उत्तर मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकांचे राज्य असले तरीही त्याचे नियंत्रण मात्र दुसरीकडेच असल्याचे कधीही लपून राहीलेले नाही. पालिकेत आजही होणारी कामं ठराविक आणि ठरलेल्या ठेकेदारांमार्फतच होतात हे त्याचे खूप मोठे उदाहरण आहे. पालिकेच्या प्रशासकपदी असलेल्या मुख्याधिकार्यांना ‘विशेष’ मागणीवरुन आणले गेले आहे, हे देखील लपून राहीलेले नाही. असे असताना बुधवारी शहर काँग्रेसने इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच हाती सत्ता असलेल्या कार्यालयावर आपलाच मोर्चा नेण्याचा हा प्रकार संगमनेरकरांना मात्र अचंबित करणारा ठरला आहे.