सावधान! पावसाचा जोर वाढताच चंदनापुरीचा घाट बनला धोकादायक ठेकेदार कंपनी मलिदा खाण्यात गुंग; डोंगरावरुन घरंगळणार्या दरडी थेट महामार्गावर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेकडो निष्पापांचे बळी घेतल्यानंतर कोट्यावधी रुपये खर्च करुन नूतनीकरण झालेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आजही सुरक्षित होवू शकलेला नाही. मानवी चुकांमुळे या महामार्गावर प्रवाशांचे जीव जाण्याच्या घटना नेहमीच घडत असतांना आता पठारभागात कोसळणार्या पावसाने डोंगरमाथ्यावरुन दगड-धोंडे आणि माती घरंगळत थेट महामार्गावर येवून कोसळत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुनच चंदनापुरी घाट ओलांडण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसानंतरच असाच प्रकार घडला, मात्र सुदैवाने त्यावेळी तेथून एकही वाहन जात नसल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. मात्र दरवर्षी असे प्रकार घडत असतांनाही ठेकेदार कंपनी त्यावर प्रभावी उपाय करीत नसल्याने या मार्गाव्रुन जाणार्या प्रवाशांचे जीव आजही रामभरोसेच असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांमध्ये पुणे-नाशिक महामार्गाचा समावेश होतो. या रस्त्यावरुन दररोज हजारो वाहनांची वाहतूक होते. त्यातून पूर्वी नेहमी अपघात घडत गेल्याने या मार्गाची ओळख मृत्यूघंटा अशी झाली होती. नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर शासनाने या महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आणि पाच वर्षांनंतर सिन्नर ते खेडपर्यंतचा नवा महामार्ग निर्माण झाला. 2017 साली 70 टक्के काम पूर्ण झाल्याने शासन नियमानुसार सदर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासह हिवरगाव पावसा येथे टोलनाका उभारुन टोल वुसलीही सुरु झाली. त्यानंतरच्या कालावधीत राहिलेली 30 टक्के कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना कंपनीने मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन फक्त मलिदा लाटण्याचा उद्योग सुरु केला. त्याचा परिणाम मृत्यूघंटेला पर्याय म्हणून निर्माण झालेल्या या महामार्गाची ओळखही मृत्यूघंटा म्हणूनच होवू लागली.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीचा घाट म्हणजे वाहनचालकाचा कस पाहणारा घाट म्हणून परिचित आहे. याच घाटाने आजवर अनेकांचे जीवही घेतले आहे. त्यामुळे नूतनीकरणात हा घाट वगळून डोंगर फोडण्यात आला व त्यातून निर्माण झालेल्या खिंडीतून हा महामार्ग नेवून घाटातील धोकादायक वळणं टाळली गेली. मात्र डोंगर फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंगाचा वापर केला गेल्याने त्याच्या स्फोटाने आसपासचे डोंगरही खिळखिळे बनले. त्यातून गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळू लागल्याने अपघातांची शक्यता वाढत राहिली. त्यामुळे कंपनीने काही ठिकाणी डोंगरावर जाळ्या बसवल्या.
मात्र आता त्या जाळ्याही जीर्ण झाल्याने आणि काही ठिकाणी तुटल्याने डोंगरावरुन निसटलेले दगड-धोंड पुन्हा एकदा थेट रस्त्यावर कोसळत आहेत. त्यामुळे काही कालावधीसाठी सुरक्षित वाटणारा या मार्गावरील प्रवास आता पुन्हा धोकादायक बनला असून त्याचा प्रत्यय शुक्रवारी सायंकाळी आला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने चंदनापुरी घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी छोट्या स्वरुपाच्या दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र सुदैवाने त्यावेळी त्या भागातून एकही वाहनाची ये-जा न झाल्याने कोणताही अपघात घडला नाही.
याबाबतची माहिती मिळताच डोळासणे महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, नारायण ढोकरे, भरत गांजवे, अरविंद गिरी, ठोंबरे यांच्यासह टोलनाका कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महामार्गावर पडलेले छोटे दगड व माती बाजूला काढण्यात आले. संगमनेर तालुक्यात सर्वदूर भीज पाऊस सुरूच असल्याने चंदनापुरी घाटातील अनेक दरडी मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे घाटातून प्रवास करताना वाहनचालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरडी कोसळू नये व त्यातून कोणाही निष्पापाचा बळी जावू नये म्हणून घाटात कायमस्वरुपी प्रभावी उपाय करण्याची गरजही यातून निर्माण झाली आहे.
चंदनापुरी घाटात दगडी कोसळून महामार्गावर आल्याचे समजताच घटनास्थळी धाव घेतली. भविष्यात घाटातील डोंगरांच्या दरडी कोसळून महामार्गावर येवून जीवितहानी होवू नये म्हणून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. या घटनेची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून सततच्या पावसामुळे दरड कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला असून तत्काळ उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.
– सचिन सूर्यवंशी (सहाय्यक पोलीस निरीक्षक-डोळासणे महामार्ग)