कोविडवर मात करण्यासाठी भेंडा येथे रुग्णालय सुरू
कोविडवर मात करण्यासाठी भेंडा येथे रुग्णालय सुरू
तालुक्यातील पंचेचाळीस डॉक्टरांनी एकत्र येत घेतला निर्णय
नायक वृत्तसेवा, नेवासा
नगर जिल्ह्यासह इतर बाहेरच्या ठिकाणीही कोविड रुग्णांची बेडअभावी होणारी हेळसांड लक्षात घेता नेवासा तालुक्यातील जनतेसाठी तालुक्यातीलच चाळीस डॉक्टरांनी एकत्र येऊन सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात भेंडा येथे सर्व सुविधांसह सुसज्ज ’नेवासा तालुका डॉक्टर्स कोविड हॉस्पिटल’ या नावाने कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासून (ता.14) सुरू करण्यात आले आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील संत नागेबाबा भक्त निवास सध्या मोकळे असल्याने तेथे खाटांसह मुबलक पाणी, प्रसाधनगृह, ऑक्सिजन आदिंची सुविधा करण्यात आली असून नेवासा तालुक्यातील रुग्णांची इतर ठिकाणी परवड व हेळसांड होऊ नये म्हणून या रुग्णालयाचे मुख्य प्रवर्तक असलेले नेवासाफाटा येथील श्वास रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश काळे यांच्या संकल्पनेतून व नेवासा येथील डॉ.शंकर शिंदे, लक्ष्मी क्लिनिक व समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख डॉ.करणसिंह घुले, डॉ.विजयकुमार मुळे, डॉ.रवींद्र दरंदले, डॉ.भारत मरकड, डॉ.संजय भदगले, डॉ.वाल्मिक तुवर, डॉ.किशोर लांडे, डॉ.संतोष ढवाण, डॉ.सचिन साळुंके, डॉ.प्रणव जोशी, डॉ.शिवराज गुंजाळ, डॉ.विनय छनाली, डॉ.शिवतेज दारुंटे यांच्यासह पंचेचाळीस डॉक्टरांना एकत्र आणून कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबत पुढाकार घेतला आहे.
या रुग्णालयात पन्नास बेडसह व्हेंटिलेटर, ऑक्सिजन लाईन व इतर सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. शासनाच्या दरपत्रकानुसार शुल्क आकारले जाईल असा विचार करून हे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रुग्णांना कोरोनातून मुक्त करून त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न आम्हा सर्व डॉक्टर मंडळींचा राहणार असल्याचे मुख्य प्रवर्तक डॉ.अविनाश काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. नेवासा तालुक्यासाठी संत नागेबाबा भक्त निवास हे अल्पशा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.अविनाश काळे व डॉ.शंकरराव शिंदे यांनी नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूबाळ काळे यांना धन्यवाद दिले. युवानेते गणेश गव्हाणे यांनी ‘आम्ही गावकरी’ या नात्याने रुग्णालयासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. तर अव्वाच्या सव्वा पद्धतीने इतर ठिकाणी होणारी लूट थांबावी म्हणून हा निर्णय नेवासा तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येऊन घेतला असल्याचे हॉस्पिटल प्रशासकीय मंडळाचे सदस्य डॉ.करणसिंह घुले यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर, ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर डॉ.विजयकुमार मुळे यांनी आभार मानले.
रुग्णालयाची वैशिष्ट्ये ः
दहा आयसीयू बेड, पन्नास सुसज्ज बेड, तज्ज्ञ डॉक्टरांची भेट, चोवीस तास सेवा, वेलट्रेन नर्सिंग स्टाफ, एसी रूम, व्हेंटिलेटर्स, बायपॅप, आहार मार्गदर्शन, आयुर्वेदाचार्याची भेट, प्राणायाम व योगाचे धडे, जेवण, संशयित रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था