अवकाळीनंतर धुक्याचा फळबागांसह कांदा रोपांनाही फटका! निसर्गाच्या लहरीपणापुढे पठारभागातील शेतकर्यांनी टेकले हात..
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या तीन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, त्यानंतरही वातावरणात बदल होत असून, सततचे धुके राहत असल्याने डाळिंब, द्राक्ष बागांसह कांद आणि कांदा रोपांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे एकामागून एक येणार्या अस्मानी संकटांनी पठारभागातील (ता.संगमनेर) शेतकर्यांनी लहरी निसर्गापुढे हातच टेकले आहे.
संगमनेर तालुक्यासह पठारभागात गेल्या तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर कडक्याची थंडी आणि आता सर्वत्र धुकेच धुके पडत आहे. याचा फटका डाळिंब, द्राक्ष आदी फळबागांसह कांदा आणि कांदा रोपांना बसत आहे. डाळिंबाला चांगला बहर यावा म्हणून उत्पादक शेतकर्यांनी महागडी औषध फवारणी केली. त्याचा परिणाम होवून चांगला बहरही आला. मात्र अवकाळी पाऊस व धुक्याने शेतकर्यांच्या आशेवर पाणी फिरले. झाडांना लगडलेली कैरी गळून जात आहे. त्यामुळे बागेत फुलांचा खच साचल्याने लालबुंद सडा पडल्याचे दिसत आहे.
याचबरोबर कांद्याला चांगले बाजारभाव राहतील या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी गावठी कांद्याची रोपे टाकली. मात्र आता हीच रोपे अवकाळी व धुक्याने पिवळी पडली असून शेंडेही वाकडे झाली आहेत. तसेच कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा व मव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. लाल कांदे काढण्याचे काम सुरू असून, त्यांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. आता अवकाळीने उघडीप दिली असली तरी शेतकर्यांवर पीक जगवण्यासाठी महागाडी औषधे फवारण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. एकामागून एक येणार्या संकटांनी शेतकर्यांनी अक्षरशः निसर्गाच्या लहरीपणापुढे हात टेकले आहेत.