नगर-वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पाहून राज्यमंत्री संतापले! संबंधित अभियंत्याला तात्काळ निलंबित करण्याचे वरीष्ठ अधिकार्‍यांना आदेश

नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर-वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा पाहून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच संतापले. विकास कामासाठी पैसे आणण्यास येथे नाकीनऊ येतात आणि त्याचा अशा पद्धतीने उपयोग होणार असेल तर ते मला चालणार नाही. त्यामुळे तातडीने येथील अभियंत्याला निलंबित करा, असे आदेशच तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना दिले.


अहमदनगर दौर्‍यावर असताना राज्यमंत्री तनपुरे यांनी वांबोरी-नगर रस्त्यावर खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी खड्डे बुजविण्याच्या कामात डांबर, खडी योग्य प्रमाणात नसल्याचे तनपुरे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तनपुरे चांगलेच संतापले व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना तेथूनच फोन लावला. खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करावे आणि संबंधित दोषी अधिकार्‍यांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेशही तनपुरे यांनी दिले.

यावेळी राज्यमंत्री तनपुरे वरीष्ठ अधिकार्‍याला फोन लावून म्हणाले, ‘एखाद्या कामासाठी पैसे आणता आणता नाकीनऊ येतात. या पैशाचा असा उपयोग होणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. इथला कोण इंजिनियर आहे तो निलंबित झाला पाहिजे. दरवर्षी आपण हेच करत रहायचे का? मला हे अजिबात चालणार नाही. इथला इंजिनियर उद्याच्या उद्या निलंबित झाला पाहिजे. जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. दरवर्षी आपण केवळ खड्डे बुजवत बसवायचे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, तनपुरे यांनी अधिकार्‍याला फोन करतानाचा व्हिडीओ चांगलाच समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे आता संबंधित दोषींवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 117860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *