शिर्डी नगरपरिषदेच्या प्रक्रियेस वेग; पडद्यामागे नाट्यमय हालचाली आमदार आशुतोष काळेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांसह नगरविकास मंत्र्यांची भेट
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना पडद्यामागे नाट्यमय हालचालींना वेग आलाय. गुरुवारी (ता.2) आमदार आशुतोष काळे यांनी येथील पदाधिकार्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर तातडीने नगरपरिषदेत करावे, अशी मागणी करणारे निवेदन त्यांना दिले. त्यामुळे या निवडणुकीवर बहिष्कार कायम ठेवून शिर्डीकर नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करण्याच्या प्रक्रियेस हातभार लावणार, की लागोपाठ दोन निवडणुकांना सामोरे जाणार, याबाबतची चर्चा रंगू लागली आहे.
लोकसंख्या 31 हजारांहून अधिक झाल्याने या नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच दिले आहेत. त्यावर कार्यवाही न झाल्याने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात आणखी दोन याचिका दाखल आहेत. या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी येत्या सात डिसेंबर रोजी होणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज सलग दुसर्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी एकत्र येऊन नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याबाबत विचारविनिमय केला होता. या नगरपंचायतीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सूचना पदाधिकार्यांना दिली.
आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्याने सरकारी पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. विधी व न्याय विभागाकडून, नगरपरिषद निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा अध्यादेश काढला जाऊ शकतो. उद्या याबाबत काहीतरी निर्णय होईल, अशी आम्हांला आशा आहे.
– नीलेश कोते (माजी उपनगराध्यक्ष, शिर्डी)