उद्या लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा! निवृत्ती महाराज देशमुख यांनी पुन्हा विरोधकांना फटकारले
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सुप्रसिद् कीर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडिया आणि विरोधकांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांचे एखादे वादग्रस्त विधान सोशल मीडियातून व्हायरल होते आणि महाराज नव्या वादात अडकतात. त्यामुळे आपल्या कीर्तनातून इंदुरीकर नेहमीच विरोधकांचा समाचार घेतात. ‘आपण वास्तव मांडतो, त्यामुळे टीका केली जाते. आपली विधाने चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून व्हायरल केली जातात. उद्या हेच लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा,’ असे म्हणत निवृत्ती महाराज देशमुख यांनी (इंदुरीकर) यांनी पुन्हा एकदा विरोधकांना फटकारले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील एका कार्यक्रमात इंदुरीकरांनी कीर्तनातूनच आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आपण खरे बोलतो, समाजातील वास्तव मांडतो. त्यामुळे काही लोक माझ्या सतत मागे लागतात. माझ्या कीर्तनातील एखादे विधान सोशल मीडियातून व्हायरल केले जाते. त्याद्वारे गैरसमज पसरविले जातात. दररोज सकाळी झोपेतून उठतो तेव्हा माझ्या मागे काहीतरी नवी झंजट लावलेली असते. तरीही मी खर्याची साथ सोडणार नाही. जी काही टीका होईल ती सहन करीत वास्तव मांडत राहणार. आभाळात विजा कडकडत असल्या तरी ढगांतून पाऊस पडतो याचे समाधान आहे. त्यामुळे विजांचा हा कडकडाट सहन करायला काय हरकत आहे? असे म्हणून आपण आपले काम सुरू ठेवले आहे. उद्या हेच लोक म्हणतील इंदुरीकरांची नार्को चाचणी करा,’ असेही इंदुरीकर म्हणाले.
सोशल मीडियातून त्यांच्यावर होत असलेली टीका आणि बदनामी यासंबंधी त्यांनी खेद व्यक्त केला. ही मंडळी जोडतोड करून विधान प्रसारित करीत असल्याचे ते म्हणाले. समाजाचे किती तरी प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांना वाचा फोडली पाहिजे. त्यातील वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी इंदुरीकरांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘इंदुरीकर महाराज स्पष्ट वक्ते आहेत. त्यामुळे काहींनी त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला असला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.’