शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यातील गुंफण ‘विमान प्रवासाच्या गोष्टी’तून उलगडते ः डॉ. मालपाणी भाऊसाहेब कासार लिखीत ‘विमान प्रवासाची गोष्ट’ पुस्तकाचे प्रकाशन

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील शाळा व शिक्षक हे समृद्ध असून त्यांनी आईच्या मायेने मातेच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्यांशी नाते जपलेले आहे. भाऊसाहेब कासार यांच्या विमान प्रवासाची गोष्ट हे पुस्तक शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यातील गुंफण उलगडून दाखविते असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

आदर्श शिक्षक भाऊसाहेब कासार यांनी लिहिलेल्या ‘विमान प्रवासाची गोष्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपरे, अगस्ति महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, अक्षरभारतीचे अध्यक्ष भानुदास आभाळे, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर यांच्यासह तालुक्यातील शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संजय मालपाणी यांनी विमान प्रवासाचा अनुभव कथन केला. तसेच विमान प्रवासाची गोष्ट या पुस्तकातून मुलांचे भावविश्व लेखकाने अभ्यासपूर्णरितीने मांडले असल्याचे नमूद केले. पद्मश्री राहीबाई पोपरे म्हणाल्या, मुले ही देवाघरची फुले आहेत, त्यांना घडविण्याचा आनंद हा वेगळाच आहे. तसेच मला मिळालेला पुरस्कार हा काळ्या आईच्या सेवेचा सन्मान असल्याचेही सांगितले. प्राचार्य डॉ. भास्कर शेळके म्हणाले, विद्यार्थ्यांचे चैत्यन्य शिक्षकाला म्हातारा होऊ देत नाही. जे विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात ते समाजाला दिशादर्शक असतात. गुरू आणि चांगले रस्ते एकसारखे असतात. म्हणूनच चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहोचवतात. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवायची असेल तर शिक्षकांमध्ये कौशल्य असणे आवश्यक आहे. जे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढवतील तेच राष्ट्र घडवतील असे म्हणाले.

गटशिक्षणाधिकारी कुमावत म्हणाले, ज्ञानदीप प्रतिष्ठान हे चांगल्या व उपक्रमशील शिक्षकांचे प्रतिष्ठान असून सर्वांनी ज्ञानदीपमध्ये सहभागी होऊन नवीन नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करावे. लेखक भाऊसाहेब कासार यांनी लॉकडाऊन काळातील लेखनप्रवास उलगडून सांगितला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब कासार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन आवारी, दीपक महाराज देशमुख, सचिन देशमुख, नीलेश देशमुख, अमोल देशमुख, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते बायफचे अधिकारी जितीन साठे, योगेश नवले, कलाशिक्षक मीनानाथ खराटे उपस्थित होते. स्वागत विलास गव्हाणे यांनी केले, प्रास्ताविक अनिल पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कडलग यांनी केले तर आभार बाळासाहेब शेळके यांनी मानले.

‘विमान प्रवासाची गोष्ट’ पुस्तक हे पु. ल. देशपांडे यांच्या अपूर्वाईशी मिळते जुळते व नाते सांगणारे आहे. मुलांच्या अनुभवविश्वाचे यथार्थ वर्णन यात वाचायला मिळते.
– डॉ. भास्कर शेळके (प्राचार्य-अगस्ति महाविद्यालय अकोले)

Visits: 196 Today: 2 Total: 1873668

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *