प्रत्येकाने आपापल्या धर्माचरणाने वागावे ः भास्करगिरी महाराज दत्तजयंती महोत्सवाची काल्याची दहीहंडी फोडून सांगता
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे आयोजित दत्तजयंती महोत्सवाची बुधवारी (ता.२७) गुरूदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून सांगता करण्यात आली. ज्याने त्याने आपापल्या धर्माचरणाने वागावे, इतरांना धक्का लावून वाढविला जातो त्याला धर्म म्हणता येणार नाही. तुम्ही जगा व आम्हांलाही जगू द्या हे तत्व सांगणारी भारतीय संस्कृती महान असल्याचे प्रतिपादन महंत भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
देवगड येथील ज्ञानसागर सभामंडपात झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलताना महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, की श्रद्धा ही अशी आहे की जी नष्ट करता येत नाही, श्रद्धेमुळेच भारतीय माणूस आज टिकून आहे असे सांगून त्यांनी दत्त महिमा व सद्गुरु किसनगिरी बाबांचे कार्य विषद केले. आज सद्गुरू श्री किसनगिरी बाबांनी घालून दिलेल्या नियमांनुसार येथील परमार्थाची वाटचाल सुरू आहे. संत संगतीत राहून पारमार्थिक वैभव वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, स्वामींचे पिताश्री दिनकर महाराज मते, गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने, रामनाथ महाराज पवार, बालब्रम्हचारी श्री विश्वनाथगिरी महाराज, भगवान महाराज जंगले, नंदकिशोर महाराज खरात, अतुल महाराज आदमने, कोंडीराम महाराज पेचे, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, गणपत महाराज आहेर, मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव, संजय महाराज सरोदे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, गणेश महाराज दरंदले, महेंद्र महाराज शेजूळ, नामदेव महाराज कंधारकर, बाबासाहेब महाराज सातपुते, रामनाथ महाराज शेळके यांसह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.