कोरोना विधवेला सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून दिले हक्काचे घर! पद्मश्री राहिबाई पोपेरे व आमदार डॉ. किरण लहामटेंच्या उपस्थितीत झाले हस्तांतरण

नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोनात विधवा झालेल्या भगिनींच्या घरी कार्यकर्ते सांत्वनासाठी भेट देतात. फलकाच्या भिंती तयार करून उभे केलेले तिचे घर बघून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. तिला घर बांधून देण्याचा निर्धार करतात आणि बघता बघता गावाच्या मदतीने लोकवर्गणीतून घर उभे राहते. त्या घराच्या हस्तांतरण कार्यक्रमात समाजाच्या सद्भावनेचा हा साक्षात्कार सर्वांनाच हेलावून गेला. रविवारी (ता.28) अकोल्यात या घराच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते व आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी कांचन शिंदे यांच्या हातात घराची किल्ली दिली. ‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ अकोल्यात स्थापन झाली. त्या समितीच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन कोरोना विधवांना भेटी दिल्या. कांचन शिंदे यांच्या घरी भेट दिली तेव्हा, ती आणि त्यांच्या दोन लहान मुली केवळ फलकाचे पडदे लावून राहत होत्या. घराच्या भिंतीही उघड्या होत्या. ते बघितल्यावर कार्यकर्त्यांनी त्या महिलेला घर बांधून द्यायचे ठरवले. आणि बघता बघता लोकवर्गणीतून दीड लाख रूपये जमले आणि त्यातून घर उभे राहिले.

या घराच्या हस्तांतरणावेळी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, शांताराम गजे, प्रकाश टाकळकर, भानुदास तिकांडे, अरुण रुपवते, गणेश कानवडे, सोनाली नाईकवाडी, मच्छिंद्र मंडलिक, सुनील कोळपकर, अनिल कोळपकर, दीपक जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. सावंत म्हणाले, अकोले तालुक्यातील चळवळी सातत्याने गरीब कष्टकरी माणसांच्या बाजूने उभे राहतात. अकोल्यातून सुरू झालेला हा उपक्रम अशीच राज्याला दिशा देणारी आहे असे सांगून या चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून कौतुक केले. एस. ई. जोशी यांनी कांचन यांना साडी चोळी दिली. यावेळी कोरोना एकल पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते मनोज गायकवाड, ललित छल्लारे, नवनाथ नेहे, संगीता साळवे, रोहिणी कोळपकर, प्रतिमा कुलकर्णी, सुभान शेख आदी उपस्थित होते.
