काँग्रेसच्या स्वबळाचा अंतिम निर्णय ‘त्या’नंतरच होईल ः थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या घोषणेवर महसूल मंत्र्यांची प्रतिक्रिया
नायक वृत्तसेवा, नगर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासंबंधी तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकार्यांना दिल्या आहेत. तशी तयारी सर्वत्र सुरू झाली असली तरी महसूल मंत्री तथा पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मात्र काहीसा वेगळा सूर लावल्याचे संकेत दिसून येत आहेत. अहमदनगरमध्ये बोलताना थोरात म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये अध्यक्ष सांगतात त्यानुसार धोरण ठरते. पक्षाच्या अध्यक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करायला सांगितले आहे. त्यादृष्टीने आम्ही कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत आहोत. अंतिम निर्णय त्यानंतरच होऊ शकेल,’ असे थोरात म्हणाले. मात्र, ‘महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करीत असून पुढेही अशीच आघाडी असावी, अशी आता जनतेचीही अपेक्षा आहे’, असेही थोरात यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महसूल मंत्री थोरात यांनी नुकतीच अहमदनगरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या निवडणुका या टप्प्यात होत आहेत. यासंबंधी मते जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काँग्रेस पक्षात अध्यक्ष सांगतात त्यानुसार धोरण ठरत असते. आमच्याकडे अध्यक्ष हा अध्यक्ष असतो. अध्यक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करायला सांगितले आहे. त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेत आहोत. त्यानंतर महाविकास आघाडी बाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र, राज्यातील जनता महाविकास आघाडी बरोबरच असल्याचे दिसून येते. राज्य सरकार चांगले काम करत आहे. जनमताच्या चाचण्या पाहिल्या तर त्यामध्येही जनतेचा कौल आघाडी सरकारच्या बाजूनेच असल्याचे दिसते. पुढच्या काळातही असेच काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे,’ असेही थोरात म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यासंबंधी विचारले असता थोरात म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. उरलेली तीन वर्षे हे सरकार चांगले काम करणार आहे. सरकार टिकणार नाही असे म्हणणारे महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीच्या वेळीही असेच म्हणत होते. आताही तसेच म्हणत आहेत. मात्र, हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार याची खात्री आहे’, असेही थोरात म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना पत्र पाठवून स्वबळावर लढण्याची तयारी करण्यास कळविले आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक पाळीवरील आघाड्याही प्रदेशस्तरावरून मान्यता घेतल्याशिवाय करू नयेत, अशाही सूचना केल्या आहेत. असे असले तरी थोरात यांच्यासह काही नेते आघाडी करण्याच्या बाजूने असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. डिसेंबर महिन्यात या निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग येईल. त्यावेळी काँग्रेसचा नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जुळणार का? हे या बैठकांमधून पुढे येईल.