शेवगाव आगारातील कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न अहमदनगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू; प्रकृतीत सुधारणा

नायक वृत्तसेवा, शेवगाव
एसटी कर्मचार्‍यांचा संप आणि त्यातून होणार्‍या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेवगाव आगारातील एका कर्मचार्‍याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर अहमदनगर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. संप आणि त्यातून आलेल्या तणावतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, यासंबंधी त्यांनी अधिकृतपणे तक्रार केलेली नाही.

एसटीच्या शेवगाव आगारात कार्यरत चालक सतीश जीवन दगडखैर (वय 47, रा. लोहसर खांडगाव, ता. पाथर्डी) यांनी शनिवारी रात्री घरीच विषारी औषध घेतले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दगडखैर 2005 पासून एसटीच्या सेवेत आहेत. सध्या सुरू असलेल्या संपात ते सहभागी झाले. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीवर ते ठाम आहेत. त्याच तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. मात्र, यासंबंधी अधिकृतपणे तक्रार करण्यात आलेली नव्हती. यावर अधिक बोलण्यासही त्यांच्या मुलाने नकार दिला.

शेवगाव आगारातील संप मागे घेण्यात आला असला तरी धूसफूस सुरूच असल्याचे दिसून येते. दुसर्‍या दिवशीही बसवर दगडफेकीची घटना घडली. रविवारी शेवगाव-नेवासा ही बस शेवगावकडे परतत असताना भानसहिवरा गावाजवळ समोरील बाजूने दगडफेक करण्यात आली. बसची काच फुटून एक दगड चालक दत्तात्रय नारायण काकडे यांना लागला. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे. शेवगाव येथील आगार प्रमुखांनी स्वतः काकडे यांना अहमदनगरमध्ये आणत रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप लबडे यांनी दिली.

Visits: 12 Today: 1 Total: 116426

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *