संगमनेर पोलिसांनी गाठला सुतावरुन स्वर्ग! पोलीस उपअधीक्षकांची चाणाक्ष नजर आणि कर्मचार्यांची जीवतोड मेहनत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऐन दिवाळीच्या दिवशी संगमनेरनजीकच्या घुलेवाडी शिवारात घडलेली खूनाची घटना हाती कोणताही पुरावा नसतानाही अवघ्या 48 तासांतच आरोपीसह उघड झाली. यावरुन पोलिसांचे हात किती लांब असतात याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांनी घेतला. खरेतर या घटनेत ज्या महिलेचा खून झाला ती अनोळखी आणि वेडसर होती, त्यासोबतच संगमनेरसह आसपासच्या कोणत्याही पोलीस ठाण्यात अशा वर्णनाची कोणतीही महिला बेपत्ता असल्याची नोंद नसल्याने या घटनेचा पोलीस किती गांभिर्याने तपास करतील अशीच शंका होती. मात्र पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या चाणाक्ष नजरेने घटनास्थळी पडलेली सुरी हेरली आणि त्या सुरीनेच आरोपीचा माग काढून दिला. या तपासातून पोलीस सुतावरुन स्वर्गात कसे पोहोचतात याचाही अनुभव संगमनेरकरांनी घेतला.
4 नोव्हेंबर रोजी रात्री घुलेवाडी शिवारातील कामगार वसाहतीच्या मागील बाजूच्या पटांगणात हा सगळा प्रकार घडला. सुरुवातीला अज्ञात असलेली मात्र आरोपीसह ओळख स्पष्ट झालेली संगमनेरातील 40 वर्षीय मानसिक संतुलन हरपलेली महिला या घटनेत बळी पडली. खरेतर एखाद्या घटनेनंतर पोलिसांवर समाजाचा मोठा दबाव असतो. त्यातूनच पोलिसांना त्याचा तपास करावा लागतो. या घटनेत मात्र पीडित महिला अनोळखी असण्यासह ती वेडसर असल्याने समाजापासून दुर्लक्षितच होती. मात्र आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता जोपसण्याची जबाबदारी असलेल्या संगमनेर पोलिसांनी दबाव विरहित घटना असूनही त्याचा कसून तपास करीत केवळ महिलेची ओळखच स्पष्ट केली नाहीतर वासनेच्या आहारी जावून तिचा निर्घृण खून करणार्या आणि घटनेपासून तब्बल 18 दिवस अज्ञात असलेल्या आरोपीचाही शोध घेवून त्याला जेरबंद केले.
गेल्या सोमवारी (ता.22) सदर खूनाचा प्रकार उघड झाला. यावेळी घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी आपल्या नजरेतून परिसराचे निरीक्षण केले असता त्यांना महिलेच्या अंगावरील कपड्यांसह एक लाकडी दांडा, शॉल आणि रक्ताने माखलेली सुरी दिसली. कपडे, दांडा अथवा शॉल यातून फारसे काही हाती लागण्याची शक्यता तशी धुसरच होती, मात्र घटनास्थळी सापडलेल्या त्या सुरीत मदने यांना आरोपीपर्यंतचा मार्ग दिसला आणि सरतेशेवटी ते त्याच्यापर्यंत पोहोचलेही. आजवर अशा अनेक घटना पाहणार्या, अनुभवणार्या आणि त्यांचा तपासही करणार्या उपअधीक्षक मदने यांनी सदरची सुरी पाहताच ही हॉटेलमध्ये वापरली जाणारी आणि केवळ कांदे कापण्याच्या उपयोगाची सुरी असल्याचे हेरले.
गुन्ह्याचे गांर्भीय आणि त्याचा समाजमनावर होणारा परिणाम यांचा विचार करुन त्यांनी आवश्यक त्या सूचना देत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याकडे तपासाची सूत्रे दिली. त्यानुसार देशमुख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामे, शवविच्छेदनासारखे सोपस्कार सुरु असतानाच मजबुत देह असलेल्या त्या महिलेचा मृतदेह सहजपणे वाहून नेणे अशक्य असल्याचा अंदाज बांधून आसपासच्या हॉटेलांवरच लक्ष केंद्रीत केले. त्यातूनच घटनास्थळाच्या अगदी जवळच असलेल्या विकास हॉटेलमध्ये अगदी तशीच सुरी आढळून आली आणि पंचानामा होताहोता या खुनाचा धागा आरोपीच्या गळ्याभोवती गुंडाळला गेला. पोलिसांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणार्या प्रतिप्रश्नांनी हॉटेलचालकाच्या तोंडावरची पट्टी उघडली आणि घटनास्थळावर सापडलेली शॉल आणि सुरी या दोन्ही गोष्टी आपल्या हॉटेलमधीलच असल्याचे त्याला सांगावे लागले.
त्याशिवाय आपल्या हॉटेलमध्ये काम करणारा रुपचंद वर्मा नावाचा एक कामगार गेल्या 5 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितल्यावर मयत आणि गुन्हेगार दोघेही अज्ञात असूनही पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच त्या सुरीवरुन ओरापीची ओळख उघड केली. आता समस्या होती कोणताही ठावठिकाणा नसलेल्या ‘त्या’ आरोपीला बेड्या ठोकण्याची. मात्र येथेही पोलिसांनी शोधमोहीम राबवून सात वर्षांपूर्वीचा त्याचा व्यवहार शोधून काढला आणि त्यावरुन तांत्रिक विश्लेषण करीत पोलिसांचे हात संगमनेरपासून दिड हजार किलोमीटर अंतरावरील छत्तीसगडमधील आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले आणि 18 दिवसांपूर्वी ऐन दिवाळीला एका वासनांधाच्या कामवासनेला बळी ठरुन जीव गमावणार्या त्या अज्ञात महिलेचा मारेकरी गजाआड होण्यासह ‘अज्ञात’ असलेल्या त्या महिलेचेही ओळख पटली. हातात काहीच ठोस नसताना, मारणारा आणि मेलेला दोन्हीही अज्ञात असतांना केवळ एका सुरीवरुन पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि पोलीस सुतावरुन स्वर्गात कसे पोहोचतात याचीच अनुभूती संगमनेरकरांना मिळाली.
गेल्या काही महिन्यांत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या साखळी घटनांनी पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. या घटनेच्या तपासातून मात्र संगमनेर पोलिसांची ‘ती’ प्रतिमा काहीअंशी पुसली गेली आहे. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी या घटनेचा ध्यास घेवून केलेला सखोल तपास आणि पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, निकीता महाले, सहाय्यक फौजदार राजू गायकवाड, पो.ना.अमित महाजन, विजय पवार, सचिन उगले, फुरकान शेख (श्रीरामपूर), पो.कॉ.अमृत आढाव, साईनाथ तळेकर, सुरेश मोरे व गणेश बोरसे या कर्मचार्यांची जीवतोड मेहनत याचाच तो परिपाक होता.