कौतुकास्पद! एकाचवेळी तब्बल 64 कुटुंब नियोजन शस्रक्रिया आदिवासी पट्ट्यातील शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राची किमया

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील सर्वात जास्त कोविड चाचणी करणार्‍या व तालुक्यात सर्वात जास्त बाह्यरुग्ण तपासणी असणार्‍या शेंडीतील प्राथमिक आरोग्य केंद्राने कुटुंब नियोजन शस्रक्रियेतही बाजी मारत एकाचवेळी तब्बल 64 कुटुंब नियोजन शस्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

शेंडी हे भंडारदरा धरणाच्या उशाला असणारे नऊ गाव डांगाणाची बाजारपेठ समजली जाते. याच गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामही प्रशंसनीय आहे. या केंद्रात आत्तापर्यंत तालुक्यात सर्वात जास्त रुग्णांवर उपचार केले गेल्याची नोंद आहे. तर याच आरोग्य केंद्राने जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोविड चाचण्या करुन विक्रमच आपल्या नावावर केला आहे. आता या केंद्राने राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवशी 64 कुटुंब नियोजनाच्या शस्रक्रिया करुन शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला आहे. शिवाय शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना राजूरपर्यंत नेण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागणार होती. त्यासाठी त्यांनी विठा येथील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची मदत घेतली. त्यांनी देखील कोणतीही कुरबूर न करता शेंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मदत केली.

शेंडी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चोळके, गोरक्ष शिंदे, मुतखेलचे डॉ. संदीप उघडे व घाटघरचे डॉ. कल्याण गोयल यांनी या शस्रक्रियेत सहभागी होणार्‍या रुग्णांना कोणताहा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली. तर आरोग्य केंद्रातील व उपकेंद्रातील प्रत्येक गावातील सर्व कर्मचार्‍यांनी आपण आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे दाखवत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.

शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. एकाचवेळी 64 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पार यशस्वीरित्या पार पाडल्या असून कोविड काळातही आमच्या ग्रामपंचायतला सोबत घेत भंडारदरा परिसरातील प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यासाठी आरोग्य केंद्रातील तसेच परिसरातील उपकेंद्रांचे विशेष अभिनंदन.
– दिलीप भांगरे (सरपंच-शेंडी)

Visits: 193 Today: 1 Total: 1916454

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *