काळानुरुप होणार्‍या बदलांचा स्वीकार करण्याची आवश्यकता : गोडबोले कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना माध्यमांच्या बदलत्या स्वरुपावर भाष्य

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात देशभरातील मनोरंजन आणि वृत्तवाहिन्यांमध्ये टी. आर. पी. वाढविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम साहित्य निर्मिती आणि वाचकांवर झाला असून वाचकांचे रुपांतर प्रेक्षकांमध्ये होवू लागले आहे. काही दशकांपूर्वी धारावाहिक अथवा चित्रपटांविषयी सर्वसामान्यांच्या मनात खूप आकर्षण होते, त्याकाळी चित्रपटाची निर्मिती करताना तीन तासांचा कालावधी गृहीत धरला जात होता. मात्र आताचा जमाना यू-ट्युबसह ओटीटी प्लॅटफॉर्मचा असल्याने तीन तासांचा चित्रपट आता अवघ्या एका तासावर आला आहे. माध्यमांच्या झपाट्याने बदलत असलेल्या स्वरुपामुळे मात्र आजचा प्रेक्षकवर्ग बावचळला आहे. एकीकडे माध्यमांच्या बदलामुळे अनेक पारंपरिक गोष्टी मागे पडत असतांना या काळात नाटक मात्र कायम जिवंत राहील असा विश्वास ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक व गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केला.

संगमनेर येथील कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे चौथ्या दिवसाचे पुष्प गुंफताना ‘दृक्श्राव्य माध्यमे – आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर मर्चन्टस् बँकेचे चेअरमन दिलीप पारख होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.ओंकार बिहाणी, प्रकल्प प्रमुख अरुण ताजणे, जसपाल डंग, अनिल राठी व रवी जोशी आदी मंचावर उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना गोडबोले म्हणाले की, पूर्वी आपल्याकडे केवळ दूरदर्शनचा एकमेव पर्याय होता. त्यामुळे मनोरंजनाच्या साधनांमध्ये दूरदर्शनशी कोणाचीही स्पर्धा नव्हती. जेव्हा देशात मनोरंजनाचे खासगीकरण झाले, तेव्हा झी वाहिनीने पहिल्यांदा या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतरचा बराचकाळ या खासगी वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या दरम्यानच्या काळात खासगी वाहिन्यांची गर्दीही वाढू लागल्याने मनोरंजन क्षेत्रातील दूरचित्र वाहिन्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या या स्पर्धेत मनोरंजनासह वृत्तवाहिन्यांचीही भर पडली आणि त्यातून टी. आर. पी  वाढवण्याची नवी स्पर्धा सुरु झाली.

दूरदर्शननंतर मनोरंजन आणि वृत्तवाहिनीच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार्‍या खासगी वाहिन्यांमध्ये केवळ झी चित्रवाहिनी स्वदेशी होती, तर अन्य सर्व वाहिन्या परदेशी होत्या. अगदी काही दशकांपूर्वी दूरचित्रवाहिनी असणं म्हणजे श्रीमंतीचे लक्षण असल्याचेही आपण बहुतेकांनी अनुभवल्याचे सांगतांना गल्ली अथवा मोहल्ल्यात कोणा एकाच्या घरात असलेला टीव्ही पाहण्यासाठी आसपासची माणसं कशी एकत्रित होतं याचे उदाहरण देतांना त्यांनी रामायण, बुनियाद, मालगुडी डेज सारख्या धारावाहिकांचा नामोल्लेखही केला. जागतिकीकरणामुळे नंतरच्या काळात मात्र या सुखवस्तूंचा जगभर वेगाने प्रसार झाला आणि अवघ्या काही वर्षातच मनोरंजन आणि रंजनाची ही साधने घराघरात पोहोचल्याचे गोडबोले म्हणाले. यावेळी त्यांनी पूर्वीच्या काळात असलेले टेलिफोन आणि त्यातून घडणार्‍या गम्मतीजमतीही प्रेक्षकांना सांगितल्या.

आजच्या काळातील माणसं ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळाल्याचे आपण पाहतो, त्यातून ते स्वतःची करमणूक करण्याचे माध्यम निवडीत असल्याचेही आपल्या लक्षात येते. त्यामुळे यापुढील काळात आपल्या सर्वांनाच नवीन तंत्रज्ञानासोबत चालावे लागणार आहे. आजचे माध्यम उद्या नसेल हे गृहीत धरुन जुने सोडून अंतर, वेळ आणि पैसा या तिन्ही गोष्टींचा मेळ घालत नवीन माध्यमांचा स्वीकार करण्याची आज गरज आहे. बदलेल्या काळानुसार जो स्वतःमध्ये बदल घडवू शकतो, तोच खर्‍याअर्थी टिकून राहू शकतो या तत्त्वाचा स्वीकार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *