शंभर टक्के ई-पीक नोंदणी करणारे सावरगाव तळ राज्यात प्रथम
शंभर टक्के ई-पीक नोंदणी करणारे सावरगाव तळ राज्यात प्रथम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राजयातील शेतकर्यांना समृद्ध करण्यासाठी महसूल विभागांतर्गत ई-पीक पाहणी हा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षीच्या रब्बी हंगामापासून प्रायोगिक तत्वावर नऊ तालुक्यात सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील सावरगाव तळ गावाने 815 हेक्टर क्षेत्रावर पीक नोंदणी करत 100 टक्के पीक नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात ई-पीक नोंदणी करणारे पाहिले गाव होण्याचा बहुमान मिळविला आहे.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली तालुक्यात पालक अधिकारी नियुक्त करून पीक नोंदणीसाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यानुसार गावची सर्व नोंदणी पूर्ण करण्यासाठी पोलीस पाटील गोरक्ष नेहे, कृषी सहाय्यक गंगाराम ढोले, तलाठी रत्नप्रभा गागरे, बाबासाहेब नरवडे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना गावातील सर्व शेतकर्यांनी सहकार्य केले. मागील रब्बी हंगामातही सावरगाव तळ गावाने सर्वाधिक नोंदणीचे काम केले होते. गावच्या या यशाबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व अधिकार्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

