श्रीरामपूर ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या! पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई; मालेगावात छापा घालून केली अटक..


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूरातील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात पसार असलेल्या मुल्ला कटर टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला यश आले आहे. तांत्रिक विश्‍लेषणावरुन पसार असलेले दोघेही नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये आश्रयास असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने आज भल्या पहाटे त्यांच्या ठिकाणावर छापा घालीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या दोघांवर अपहरण, अत्याचार, पोक्सो, बळजोरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी चौघांना गजाआड केले होते, त्यात आता आणखी दोघांची भर पडली आहे. त्या दोघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


कोविड संक्रमणापूर्वी 2019 मध्ये श्रीरामपूरातील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये राहणारा कुख्यात कसाई इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35) याने अवघ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट शाळेतून उचलून नेत तिचे बळबजबरीने धर्मांतर करुन तिच्याशी निकाह केला होता. या घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणीही केली. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी त्याला दाद दिली नाही. या दरम्यान पीडित मुलगी 16 वर्षांची झाली व ती गरोदरही राहीली. या उपरांतही मुल्ला कटर तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध ठेवत होता.


या दरम्यान सदरचा प्रकार श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर जुलैमध्ये त्यांनी पीडितेच्या नातेवाईकांना घेवून थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटल्याने पोलिसांवरील दबाव वाढला. त्यामुळे पोलीस अधीक्षक पाटील यांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्यासह हवालदार पंकज गोसावी व पोलीस शिपाई सुनील दिघे यांना निलंबित केले व या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविला.


याप्रकरणी श्रीरामपूरातील कुख्यात कसाई इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35) याच्यावर भा.द.वी.कलम 363 (अ), 368, 370 (अ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलम 3, 4, 5, पिटा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी मुल्ला कटरला गजाआड केल्यानंतर त्याच्या अत्याचाराचे एक-एक प्रकरणं बाहेर पडू लागले. त्यातूनच एका 18 वर्षीय दिव्यांग महिलेला दमबाजी व धमकी देवून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत मुल्ला कटर आणि त्याच्या टोळीतील अन्य सदस्यांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार करुन तिला वेश्या व्यवसायासाठी शेवगावच्या कुंटनखान्यात विक्री केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला.


या प्रकारानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवतांना मुल्ला कटरसह प्रशांत उर्फ पप्पू दादासाहेब गोरे, गुरफान निसारखान शेख, आशु लियाकत पठाण, बाबा चंडवाल, सचिन मधुकर पगारे व मिनाबाई मुसावत यांच्यावर गुन्हा दाखल करीत मिनाबाईसह चौघांना अटक केली होती. मात्र पप्पू गोरे व सचिन पगारे मात्र तेव्हापासून पसार झाले होते. या कालावधीत त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेही घातले, मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. या दरम्यान तांत्रिक विश्‍लेषणावरुन पसार असलेले दोघेही नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दडून बसल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना समजली.


त्यानंतर त्यांनी तत्काळ आपल्या पथकाला आवश्यक त्या सूचना देत थेट मालेगावात धाडले. पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच मालेगाव गाठून कारवाईची तयारी पूर्ण केली आणि आज भल्या पहाटे दोघेही साखर झोपेत असतांनाच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आज सकाळी त्यांना श्रीरामपूरात आणल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्या दोघांनाही 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांच्या चौकशीतून आणखी काही प्रकरणं समोर येण्याची दाट शक्यता आहे. संपूर्ण राज्याला हादरवणार्‍या या प्रकरणाचा अतिशय शिताफीने तपास करीत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आत्तापर्यंत निष्पन्न झालेले सहाही आरोपी गजाआड केल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Visits: 63 Today: 2 Total: 113890

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *