चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दगडांवर पलटली! कारचालक बालंबाल बचावला; चंदनापुरी घाटातील प्रकार

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर कायमच वाहनांची वर्दळ असते. त्यात महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघातांची श्रृंखला सुरूच आहे. शुक्रवारी (ता.19) दुपारी भरधाव वेगात असणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चंदनापुरी घाटात महामार्गाच्या कडेला असणार्‍या दगडांवर पलटी झाली. मात्र, दैव बलवत्तर असल्याने कारचालक बालंबाल बचावले.

या अपघाताबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी गोपाल वाल्हेराज अंकुळनेरकर हे कामानिमित्त संगमनेरला आले होते, काम आटोपून पुन्हा ते आपल्या कारमधून माळवाडीला येत होते. दरम्यान, अत्यंत रहदारी असणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात आले असता त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून शेजारी असलेल्या दगडांवर जावून उलटली.

अपघातग्रस्त कारची चारीही चाके वर झाली होती. या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, भरत गांजवे, सुनील साळवे, मनीष शिंदे, अरविंद गिरी, संजय मंडलिक, नंदकुमार बर्डे, नारायण ढोकरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने महामार्गाच्या कडेला मोठमाठे दगड असल्याने कार तेथेच विसावली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Visits: 108 Today: 1 Total: 1103050

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *