जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत संगमनेर महाविद्यालयाचे पाच प्राध्यापक विविध विद्याशाखांचे प्रा. डॉ. बावीस्कर, ओझा, ख्याडे, आहेर व भिसे यांचा समावेश
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक पातळीवरील ‘अल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स’ तथा ‘ए. डी. सायंटिफिक इंडेक्स’ 2020-21 तर्फे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक संशोधकांच्या अद्ययावत क्रमवारीत संगमनेर महाविद्यालतील पाच संशोधक प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या क्रमवारीत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा समावेश ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे.
अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत अल्पर व सिहान डॉजर यांनी संयुक्तपणे ‘अल्पर-डॉजर सायंटिफिक इंडेक्स’ तथा ‘ए. डी. सायंटिफिक इंडेक्स’ विश्लेषित केला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकाच्या गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक व सायटेशन स्कोअर या बाबींचे पृथ्थकरण केले. 208 देशातील 13 हजार 560 शैक्षणिक संस्थांमधील 7 लाख 6 हजार 537 विविध शाखा व 256 उपशाखांतील संशोधकांचा या मानांकनात समावेश केला आहे. संगमनेरसारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात कार्यरत राहून प्रा. डॉ. प्रशांत बावीस्कर (पदार्थ विज्ञान शास्त्र), प्रा. डॉ. राजेश्वरी ओझा (रसायन शास्त्र), प्रा. डॉ. महेंद्र ख्याडे (वनस्पती शास्त्र), प्रा. डॉ. साईनाथ आहेर (भूगोल) आणि डॉ. सागर भिसे (रसायन शास्त्र) या प्राध्यापकांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांच्या यादीत समावेश होणे ही महाविद्यालयाच्या वैभवशाली परंपरेमधील शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, खजिनदार राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी नारायण कलंत्री, व्यवस्थापनातील सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, डॉ. राजेंद्र लढ्ढा व इतर मान्यवरांनी सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.