कौशल तांबेची भारतीय क्रिकेट संघात निवड
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमालाचे रहिवासी असलेले आणि आळेफाटा येथील श्री रोकडेश्वर ज्वेलर्सचे संचालक मारुती नरवडे यांचा नातू कौशल सुनील तांबे याची नुकतीच 19 वर्षाखालील (अंडर-19) भारतीय क्रिकेट संघात निवड झाली असून, त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
मूळचा पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील असलेल्या कौशलला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. सातत्याने परिश्रम घेतल्याने आणि कुटुंबाचेही पाठबळ मिळत असल्याने कौशलने दैदीप्यमान यशाला गवसणी घातली आहे. यापूर्वी त्याने स्थानिक व राज्य पातळीवर दमदार फलंदाजी करुन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या विनू मंकड स्पर्धेतही उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवत पराभव केला होता. फलंदाजीचे उत्कृष्ट तंत्र, कौशल्य, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे कौशल कायमच फलंदाजीत वर्चस्व गाजवत आला आहे. यामुळेच त्याच्या खेळाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली असून, 19 वर्षाखालील (अंडर-19) भारतीय क्रिकेट संघात निवड केली आहे. येथेही खेळाची चुणूक दाखवून लवकरच भारतीय क्रिकेटच्या वरीष्ठ संघात स्थान मिळविणार आणि संधी मिळाल्यास आयपीएलमध्येही (इंडियन प्रीमियर लीग) उत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचा मनोदय कौशल तांबे याने व्यक्त केला आहे. या यशाबद्दल कौशलचे आजोबा मारुती नरवडे, मामा सुधीर नरवडे, नरवडे परिवार आणि पठारभागातून अभिनंदन होत आहे.