‘कॉफी शॉप’च्या नावाखाली शहरात सुरू आहेत ‘अश्लिल केंद्र’! नागरिकांनीच हल्लाबोल करीत श्रमिक नगरमधील ‘कूप्रसिद्ध’ केंद्र बंद पाडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लॉकडाऊन नंतर टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यासोबतच ‘अश्लिलतेचे अड्डे’ ठरलेल्या आणि ‘कॉफी शॉप’च्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून भरकटवण्यात मोलाचा वाटा उचलणारी अशी केंद्रही जोमात सुरू झाली आहेत. शे-पाचशे रुपयांच्या लालसेने अगदी राजरोसपणे अल्पवयीनांना वाममार्गाला लावू पाहणार्या अशा केंद्रचालकांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज यातून निर्माण झाली आहे. सुसंस्कृत म्हणवणार्या शहराच्या संस्कृतीला अशा प्रकारची अनैतिक मात्र अधिकृतपणे चालणारी केंद्र एकप्रकारे बट्टाच लावीत असल्याने अशा केंद्र चालकांवर प्रचलित कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकांनीही गांभिर्याने विचार करुन पुढाकार घेण्याची गरज आहे. बुधवारी श्रमिक नगरजवळील अशाच एका केंद्रावर परिरातील नागरिकांनीच हल्लाबोल केला, यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करताना पसार झालेल्या केंद्रचालकाला बोलावून ‘त्या’ गाळ्यातील अंतर्गत ‘रचना’ तोडून ती घेवून जाण्यास भाग पाडले. अर्थात शहरातील सगळीच कॉफी शॉप याच साखळीतील आहेत असेही नाही. अनेक ठिकाणी सार्वजनिक मर्यादांचे तंतोतंत पालनही केले जाते.

संगमनेर शहरातील श्रमिकनगरमधील झोपडपट्टी भागाजवळ एका शाळेच्या अगदी लगतच कॉफी शॉपच्या नावाखाली चालणार्या अनैतिक कृत्यांचे केंद्र सुरू होते. येथील अश्लिल चाळ्यांना वैतागून परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा तेथील केंद्र चालकाला सज्जड इशारेही भरले होते. मात्र पैशासाठी वाट्टेल ते करण्याच्या कृतीतून मुजोर बनलेल्या संबंधिताने त्याकडे दुर्लक्ष करुन आपली दुकानदारी सुरुच ठेवली होती. त्यामुळे परिरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होवून त्यांनी ते केंद्र बंद पाडले होते. अनेक महिने बंद राहिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा याठिकाणी अश्लिल चाळे करणार्या जोडप्यांची रेलचेल दिसू लागली. ते पाहून परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी एकत्र येवून त्या केंद्रावर हल्ला केला. या धावपळीत केंद्रात चाळे करणारे जोडपे पसार झाले. मात्र नागरिकांनी केंद्र चालकाची यथेच्छ धुलाई केली. त्याने कुलूप लावून तेथून पळ काढला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

नागरिकांनी पोलिसांसमोर ‘त्या’ केंद्रात चालणार्या अनैतिक कृत्यांचा पाढाच वाचला. नागरिकांनी बंद केलेल्या या केंद्राचा चालक गुपचूूप येवून आत जोडपे सोडायचा व बाहेरुन कुलूप लावून निघून जायचा. ठरलेल्या वेळी तो पुन्हा येवून दुकान उघडूून आधीच्या जोडप्याला सोडून नवीन जोडपे कोंडायचा. हा प्रकार ऐकून पोलिसांनी घारगावला राहणार्या गाळ्याच्या मूळ मालकाला बोलावून घेतले. गाळ्याच्या आतील भागात अशा प्रकारचे अश्लिल कृत्य करण्यासाठी खास तयार करण्यात आलेली सगळी कंपार्टमेंटस् त्याला काढण्यास सांगण्यात आले. पुन्हा त्या ठिकाणी कॉफी शॉपच्या नावाखाली अशा प्रकारचे अनैतिक केंद्र चालवणार्यांना गाळा भाड्याने देणार नसल्याची ग्वाही त्याने उपस्थित नागरिकांना दिली आणि श्रमिकनगर जवळील ‘त्या’ कॉफी शॉपला अखेर कायमचे टाळे लागले.

गेल्या काही वर्षात शाळा व महाविद्यालयांच्या रस्त्यांवर ‘कॉफी शॉप’ अशी गोंडस नावे दिलेली अनेक दुकाने सुरू झाली आहेत. त्यातील अनेक दुकाने नियमांप्रमाणे व मर्यादा राखून चालणारी आहेत. मात्र काहींनी पैशांच्या लालसेने बाहेर कॉफी शॉपचा फलक लावून आतील भागात ‘खासगी कक्षां’ची निर्मिती केली आहे. येथे मिळणार्या कॉफीचे दर म्हणजे किती वेळेसाठी ‘तो’ खासगी कक्ष आपणास पाहिजे त्यावर अवलंबून असतात. अशा ठिकाणी बहुतेक शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीनीच आढळतात, त्यातही अल्पवयीन विद्यार्थीनींचा समावेश असतो.

मात्र त्याचा त्या केंद्र चालकावर कोणताही परिणाम होत नाही. अशा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर अनैतिक कृत्य चालूनही त्यांच्यावर कधी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही धाक नसल्यागत राजरोसपणे अगदी शाळा व महाविद्यालयांच्या जवळच अशी केंद्र सुरू आहेत. पोलिसांबरोबर पालकांनीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे. सुसंस्कृत परंपरा असलेल्या शहरात संस्कृतीचे विडंबन करु पाहणारी अशी केंद्र सुरू करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही असा धाक या अनैतिक विचारांवर बसण्याची गरज आहे. श्रमिक नगरमधील केंद्र ज्याप्रकारे तेथील नागरिकांनीच पुढाकार घेवून उध्वस्त केले, शहरातील अन्य भागात जर असे प्रकार सुरू असतील तर तेथील नागरिकांना यातून प्रेरणाही मिळाली आहे.
‘कॉपी शॉप’च्या नावाखाली सर्रासपणे अश्लिल कृत्य चालणार्या अशा ठिकाणांवर शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा अधिक भरणा असतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे. घरातून शाळा-कॉलेजच्या नावाने निघालेले काही विद्यार्थी अनेक तास या केंद्रांमध्ये घालवतात. शिक्षणाच्या वयात भरकटवण्याच्या या प्रकाराने मुलांचे शैक्षणिक नुकसानही होते. श्रमिनगरमधील असे केंद्र तेथील नागरिकांनी पुढाकार घेत उध्वस्त केले. शहरातील अन्य भागात असा प्रकार सुरू असेल तर श्रमिकनगर परिसरातील नागरिकांनी आपल्या कृतीतून तेथील नागरिकांना एक प्रकारचा संदेशच दिला आहे.

